शहरातील कचरा दोन सत्रात उठाव करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:07+5:302021-09-24T04:29:07+5:30
कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाचे काम पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनाकडे येत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन सर्व प्रभागातील ...
कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाचे काम पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनाकडे येत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन सर्व प्रभागातील कचरा पूर्ण क्षमतेने उठाव करण्यासाठी महापालिकेने रोज सकाळी सहा ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री दहा अशा दोन सत्रात संकलनाचे नियोजन केले आहे.
शहरात निर्माण होणारा कचरा संकलन करण्याकरिता १०४ ॲटो टिपर वाहने आहेत. या वाहनांद्वारे सध्या सकाळी सहा ते दुपारी दोन या सत्रात कचरा संकलन करण्यात येतो. काही प्रभागांमध्ये दोन ॲटो टिपर वाहनांद्वारे पूर्ण क्षमतेने कचरा संकलन करण्यात येत आहे तर काही प्रभागांमध्ये एकच टिपर असल्याने घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे. घंटागाडीद्वारे संकलन करण्यात येणारा कचरा कंटेनरमध्ये टाकण्यात येतो़. बरेच कचरा कंटेनर खराब झालेले आहेत. तसेच आर.सी. वाहनेही वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसापासून शहरात कचरा उठावाची समस्या गंभीर झाली आहे.
दुपारच्या सत्रात के. एम. टी विभागाकडील ५० वाहनचालक गाडीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दैनंदिनपणे पूर्ण क्षमतेने घराघरातून कचरा संकलन केल्यास कंटेनरमध्ये नागरिकांकडून कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार होईल अशी अपेक्षा आहे.
नवीन ६५ ॲटो टिपर खरेदीची प्रक्रिया पूर्ण होत आली असून सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रभागांमध्ये नियमितपणे ॲटो टिपर वाहने उपलब्ध होतील. शंभर टक्के कचरा संकलन सुरू झाल्यावर शहरातील उर्वरित सर्व कंटेनर काढण्याचे नियोजन आहे. ॲटो टिपर वाहन उपलब्ध न झाऱ्यास किंवा कचऱ्यासंबंधी काही तक्रार असल्यास ए, बी. सी व डी वाॅर्डसाठी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर (९७६६५३२०४०) , ई वॉर्डसाठी निखिल पाडळकर (९७६६५३२०३८) आरोग्य विभाग २५४०२९० क्रमाांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.