चोरट्यांकडून शहराची लूट सुरूच
By admin | Published: June 2, 2017 01:12 AM2017-06-02T01:12:17+5:302017-06-02T01:12:17+5:30
चोरट्यांकडून शहराची लूट सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर / कळंबा : गेले दोन आठवडे सुरू असलेले घरफोडीचे सत्र बुधवारी रात्रीही कायम राहिले. बोंद्रेनगर परिसरातील न्यू कणेरकरनगर, हनुमान मंदिर भागात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून तब्बल ११ घरफोड्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. दोन घरातील पाच तोळे सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले, तर तीन घरांमध्ये कोणी नसल्यामुळे किती मुद्देमाल चोरीला गेला, हे समजू शकले नाही. या घरफोड्यात सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, हा घरफोडीचा प्रकार समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने शेजारच्या शेतवडीतून माग काढला.
उन्हाळी सुटीमुळे येथील बहुतांश कुटुंबे ही आपल्या मूळ गावी गेल्याने त्यांची घरे बंद होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला. गवंडी काम करणारे नागेश साताप्पा कदम यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून तिजोरीमधील सुमारे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २० हजार रुपये चोरल्याचे स्पष्ट झाले. कदम हे मुलीच्या विवाहनिमित्त गर्लगुंजी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे गेले होते, तर मूळचे उस्मानाबाद येथील नागनाथ शांतिनाथ कांबळे कुटुंबासमवेत गावी गेले होते. त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दोन तोळे दागिने व पाच हजार रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी नेला.
रिक्षा व्यावसायिक नुरुला इस्माईल शेख यांच्याही बंद घरातील २५ हजार रुपयांचा कॅमेरा व मोबाईल चोरून नेला आहे. रमजानचे रोजे सुरू असल्याने ते सदर बाजार येथील आपल्या दुसऱ्या घरी गेले होते, तर त्यांची पत्नी आजारी असल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आनंदा शामराव वागरे हे कुटुंबासमवेत सुटीसाठी आपल्या गावी करंजफेण (ता. राधानगरी) येथे गेले होते. त्यांच्या घरामधील तीन हजार रुपये आणि चांदीचे आरतीचे ताट लंपास केले. हनुमान मंदिर येथे राहणारे मूळचे भोगमवाडी (ता. करवीर) येथील राजेश ज्ञानदेव भोगम यांच्या घरातील तिजोरी उचकटली; पण चांदीची लगड व भांडी असे कोणतेही चांदीचे साहित्य नेले नाही. धनाजी केरबा पाटील (मूळ गाव महे, ता. करवीर) यांच्या घराचा दरवाजा उचकटला, पण हाती काही लागले नाही. रामकृष्ण शंकर जाधव (मूळ गाव केळोशी खुर्द, ता. राधानगरी) यांच्या घरातील दीड हजार रुपयांचे ब्रेसलेट व ५०० रुपये लांबविले. उमेश कांबळे यांच्या घरातील तिजोरी फोडली; पण हाती काही लागले नाही. त्याचबरोबर सर्जेराव पाटील (मूळ गाव कुदळवाडी, ता. राधानगरी) यांच्या घरातच चांदीचा कारखाना आहे. त्यांच्या घराचे कुलूप उचकटले, पण चोरट्यांना या ठिकाणीही काही मिळाले नाही. तेथूनच पुढे शेतवडीकडे असलेल्या अशोक नारायण लोंढे यांच्या दुमजली घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांचे पहिल्या मजल्यावर कागदाचे गोदाम आहे. ते फोडले, पण काही मिळून आले नाही. मूळचे धामोड येथील चांदी व्यावसायिक युवराज पिलावरे हे या ठिकाणी भाड्याने राहतात. त्यांच्या घरातही चोरी झाली. या घटनांची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.
बॅग विक्रेता रडारवर
गेले तीन दिवस या भागात एक बॅग विक्रेता मंदिराजवळील असलेल्या मंडळाच्या शेडजवळ बसायचा. त्याची वर्तणूक संशयास्पद होती, असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या परिसरातील कृष्णात वरुटे व प्रवीण श्रीपती पाटील यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी गुरुवारी दुपारी घेतले. वरुटे यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा बॅग विक्रेता दिसून येतो. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहे.
टोळीची शक्यता
कोल्हापूर शहरात व उपनगरांत चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून घरफोड्या करून पोलिसांना हैराण केले आहे. त्यामुळे ही चारहून अधिकजणांची टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
चोरीची पिशवी दुसऱ्याच्या घरात टाकली
चांदीचे साहित्य असलेली पिशवी चोरट्यांनी आनंदा वागरे यांच्या घरामध्ये टाकली होती. चोरट्यांनी ती पिशवी उघडली नव्हती. ही पिशवी पाहताच वागरे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले.