‘गडहिंग्लज’मध्ये नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

By admin | Published: October 5, 2015 11:49 PM2015-10-05T23:49:04+5:302015-10-06T00:22:54+5:30

१५ दिवसांत दोन बळी : शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजनांची गरज

Civil security question in 'Gadhingjaj'! | ‘गडहिंग्लज’मध्ये नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

‘गडहिंग्लज’मध्ये नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

Next

राम मगदूम ---गडहिंग्लज--पंधरा दिवसांत भरधाव वाहनांच्या धडकेत शहरातील दोन निष्पाप महिलांचा नाहक बळी गेला. या दुर्दैवी घटनांमुळे गडहिंग्लजच्या आबालवृद्धांसह शहरातून ये-जा करणारे नागरिक व प्रवाशांच्या जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किंबहुना सुरक्षित वाहतुकीसाठी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच वाहतुकीची दैनंदिन कोंडी दूर करण्याची गरज आहे.‘गडहिंग्लज’ ही पूर्वीपासूनच सीमाभागातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. कर्नाटक-गोवा आणि कोकणला जोडणारे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाचे एक मध्यवर्ती केंद्रही आहे. पुणे-बंगलोर महामार्गावरून गोवा व कोकणात आणि कोकण व गोव्यातून पुणे-बंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते.
सीमाभागातील जवळपास दहा साखर कारखान्यांकडे उसाची वाहतूक करणारी वाहनेदेखील गडहिंग्लजमधूनच जातात. त्यामुळे ऊसतोडणीच्या हंगामात गडहिंग्लज शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न गंभीर बनतो. गडहिंग्लज शहराच्या मध्यवस्तीतील मुख्य रस्ता दुपदरी असूनही त्याचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे वीरशैव बँकेनजीक काळभैरी वेस, कडगाव रोडवरील मुसळे कॉर्नर-कांबळे तिकटी, बसस्थानकासमोरील दसरा चौक व शिवाजी पुतळ्यानजीक वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीमुळेच लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात. त्या अपघातानंतर उपाययोजनांची केवळ चर्चा होते. ठोस उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीसाठी आता जनरेट्याचीच आवश्यकता आहे.


वाहतुकीची कोंडी दूर होण्यासाठी हे करायला हवे
संकेश्वर रोडवरील साई प्लाझा हॉटेल ते भडगाव रोडवरील मराठा चित्रमंदिर, आजरा रोडवरील अर्बन कॉलनी ते कडगाव रोडवरील एमएसईबी कार्यालय, कडगाव रोडवरील विश्रामगृह ते वडरगे रोडवरील बेलबाग आणि वडरगे रोडवरील बेलबाग ते काळभैरी रोडवरील लाखेनगर अशा नियोजित चार रिंगरोडची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतुकीची कोंडी दूर होईल.
गारगोटीकडून येणारी अवजड वाहने व बसगाड्या चर्चरोड मार्गे बसस्थानक व मेनरोडवर आणावीत.
वडरगेकडून शहरात येणारी अवजड वाहने व बसेस एमआर हायस्कूलवरून चर्चरोड मार्गे बसस्थानक व मेनरोडवर आणावीत.
वीरशैव बँक ते नेहरू चौक आणि साधना बुकस्टॉल ते शिवाजी बँक या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करावी.
मार्केट यार्ड ते कोड्ड कॉलनी दरम्यान एकेरी वाहतूक आणि या मार्गावरील दोन्ही बाजूच्या दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवून विषम तारखांच्या पार्किंगचे वेळापत्रक काटेकोरपणे राबवायला हवे.
भडगाव रोड व कचेरी रोडवरील दर्ग्यासमोरील मोकळ्या जागेत मालवाहतुकीचे टेम्पो आणि खासगी प्रवासी गाड्या थांबतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र, तर शहरात ठिकठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी पुरेशा वाहनतळांची व्यवस्था हवी.
गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडहिंग्लजला वाहतूक पोलीस शाखेची आवश्यकता आहे.


आता तरी बोध घ्या !
१५ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्षकांना भेटून मुलाच्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या फरहत जलीलउद्दीन पाटील या माउलीचा मालमोटारीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ३ आॅक्टोबर २०१५ रोजी पतीच्या दुचाकीवरून नोकरीवर जाणाऱ्या महिलेचा इनोव्हाच्या धडकेमुळे मृत्यू झाला. या दोन निष्पाप व अभागी महिलांच्या नाहक बळीतून स्थानिक प्रशासन व पोलिसांनी बोध घ्यावा आणि नागरी सुरक्षेसंबंधी ठोस उपाययोजनेची मागणी आहे.

Web Title: Civil security question in 'Gadhingjaj'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.