दलित वस्ती निधीचा वाट मिटल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:29+5:302021-03-10T04:25:29+5:30
कोल्हापूर : दलित वस्ती योजनेतील ३६ कोटी रुपयांच्या निधीचा वाद मिटल्याचा दावा करण्यात आला ...
कोल्हापूर : दलित वस्ती योजनेतील ३६ कोटी रुपयांच्या निधीचा वाद मिटल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची मासिक सभा मंगळवारी माणगाव येथे पार पडली. त्यामध्ये सुमारे दोन तास चर्चा होऊन अखेर निधी वाटपाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, खातरजमा करण्यासाठी सभापती स्वाती सासने यांना फोन केला असतो त्यांचा फोन बंद होता.
गेले दीड महिना या निधीवरून वादंग सुरू आहे. सुरुवातीला पालकमंत्री सतेज पाटील आणि सासने यांच्यात यावरून वाद झाला नंतर समिती सदस्यांनी सासने यांच्या निधी वाटप निर्णयाला विरोध केला. मार्च महिनाअखेर कामे होण्याची गरज असल्याने समिती सदस्यांना प्रत्येकी ८० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याच पद्धतीने उपाध्यक्ष, शिक्षण आणि महिला बालकल्याण समिती सभापतींना निधी देण्याचे निश्चित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, एकमत होण्याआधी याच विषयावरून जोरदार चर्चा झाली.
यावेळी आंतरजातीय आणि दिव्यांगांनी दिव्यांगांशी विवाह केलेल्या दाम्पत्यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. यावेळी महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती वंदना मगदूम आणि माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मगदूम यांचाही समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती स्वाती सासने यांच्यासह सदस्य मनिषा कुरणे, कोमल मिसाळ, मनिषा माने, परवीन पटेल, मनिषा चौगुले, अशोकराव माने, महेश चौगले, सुभाष सातपुते, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे उपस्थित होते.