आठवले गटाकडून जिल्ह्यातील चार जागांवर दावा
By admin | Published: July 23, 2014 12:29 AM2014-07-23T00:29:21+5:302014-07-23T00:30:44+5:30
‘दे धक्का’ मेळाव्यात मागणी : पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या १५ जागा लढविणार
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बळ दिल्यामुळेच महाराष्ट्रात तब्बल ४२ जागांवर महायुतीचा विजय झाला. या यशात रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मोठा वाटा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात १५ जागा लढविणार असून, जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण, कागल, वडगाव आणि राधानगरी-भुदरगड मतदारसंघाची मागणी पक्षाच्या ‘दे धक्का’ मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली. महायुतीने या जागेसाठी विचार केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
आज, मंगळवारी पक्षाच्यावतीने दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस नवनाथ कांबळे, तसेच प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे, दुर्वास कदम, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते.
यावेळी स्वागताध्यक्ष दुर्वास कदम, प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे यांनी, येत्या विधानसभा निवडणुकीत भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार असल्याने शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र सहसचिव डॉ. अनिल माने यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास विश्वास सरुडकर, दिलीप कांबळे, नामदेव कांबळे, बाळासाहेब वाशीकर या तालुकाध्यक्षांनी जिल्ह्यातील चारही जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अविनाश शिंदे, काशीनाथ कांबळे, हणमंत साठे, जगन्नाथ ठोकळे, बबन हुपरीकर, नागनाथ होवाळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)