करवीरमध्ये दावे-प्रतिदावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:17+5:302021-05-03T04:19:17+5:30
कोपार्डे : गोकूळ दूध संघासाठी आज सत्ताधारी व विरोधी गटांनी शक्तिप्रदर्शन करत ठरावधारकांना मतदान केंद्रावर आणले. सत्ताधारी व विरोधी ...
कोपार्डे : गोकूळ दूध संघासाठी आज सत्ताधारी व विरोधी गटांनी शक्तिप्रदर्शन करत ठरावधारकांना मतदान केंद्रावर आणले. सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेते व कार्यकर्त्यांच्याकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सत्ताधारी गटाकडील किंंगमेकर असणाऱ्या नेत्यांनी यावेळी विरोधी आघाडीत प्रवेश केल्याने निवडणुकीत जबरदस्त आवाहन निर्माण झाल्याचे चित्र आहे. ६४१ पैकी ६३९ ठरावधारकांनी मतदानाचा हक्क बजावला.
करवीर तालुक्यातील ठरावधारकांचे शहरातील विवेकानंद कॉलेज व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज येथे मतदान होते. दोन्ही ठिकाणी सहा-सहा ठिकाणी मतदान बूथ होते प्रत्येक बूथवर सर्वसाधारण ४५ ते ५५ मतांची संख्या होती. विवेकानंद कॉलेजच्या सहा बूथवर ३०६ तर न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज येथे ३३५ मतदारांना मतदान करण्याची सोय करण्यात आली होती.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंत ३० ते ४० ठरावधारकांनी मतदान केले होते. पण विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील साडेनऊ वाजता मतदारांना ट्रॅव्हलरमधून घेऊन आले. एका रांगेत मतदान केंद्रावर ठरावधारक आल्याने केंद्रावरील वातावरण बदलले.
यानंतर साडेआकरा वाजता सत्ताधारी गटाचे ठरावधारक आमदार पी. एन. पाटील यांच्याबरोबर आले. एका कार्यकर्त्यांने आ. पाटील येताच घोषणाबाजी सुरू केली तेव्हा विरोधी आघाडीकडूनही घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना सतेज पाटील यांनी रोखले. ठरावधारकांना प्रवेशद्वारावर सोडून पी. एन. पाटील निघून गेले. दोन्ही बाजूने शांततेत मतदान झाले.
विरोधी शेतकरी आघाडीकडून परफेक्ट नियोजन
पालकमंत्री ठरावधारक मतदार मतदान केंद्रावर ट्रॅव्हलरमधून आरटीओ कार्यालयापर्यंत घेऊन आले. पिवळी टोपी, मास्क व स्कार्फ यांच्याबरोबर प्रत्येकाला पाणी बाटली देण्यात आली होती. मतदान करून येणाऱ्या प्रत्येक मतदाराला स्वतः पालकमंत्री मेडिकल कॉलेजमध्ये जेवणासाठी आग्रह करताना दिसत होते.
विरोधी आघाडीकडून मतदान केंद्रावर प्रमुख नेत्यांची हजेरी
मंत्री सतेज पाटील, चंद्रदीप नरके, आ. प्रा. जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, गोकूळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील ही नेतेमंडळी मतदान केंद्रावर हजर होती.
शेकापचेही शक्तिप्रदर्शन
शेकापच्या असलेल्या ठरावधारकांनी एकत्र येत मतदान केंद्रावर आपले शक्तिप्रदर्शन करत अस्तित्व दाखवले.
नेत्यांच्या चेहऱ्यावर तणाव
दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपले मतदान अधिक असल्याचे दावे-प्रतिदावे केले असले तरी क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी सर्वांचा आटापिटा दिसत होता. सत्ताधारी ४५० च्यावर तर विरोधी आघाडीकडून ४३० ठरावधारक आणल्याचा दावा करण्यात येत होता.
एकूण मतदान ६४१
झालेले मतदान ६३९