कोल्हापुरात पोलीस-शिवसैनिकांमध्ये धक्काबुकी, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By भीमगोंड देसाई | Published: August 13, 2022 03:00 PM2022-08-13T15:00:10+5:302022-08-13T15:00:39+5:30
पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, शनिवारी सांगली दौऱ्यावर आले आहेत. सकाळी कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन होवून ते सांगलीकडे रवाना झाले. यादरम्यान आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दूल सत्तार यांचे मंत्रीपद काढून घ्यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी शिवसेना शहर प्रमुख संजय पवार यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर असून काळी वेळ ते कोल्हापुरातही थांबणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान, शिवसेनेतर्फे आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दूल सत्तार यांचे मंत्रीपद काढून घ्यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात येणार होतीत. मात्र, निदर्शने करण्यापूर्वीच पोलिसांनी पवार यांना त्यांच्या ताराबाई पार्क येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले.
संजय पवार यांना ताब्यात घेवून जात असताना शिवसैनिकांनी पोलीस वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करून पवार यांच्यासह युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी मंजित माने, वैभव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, शहरातील इतरही काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.