Kolhapur- शक्तिपीठ महामार्ग: माणगाव येथे आंदोलक-पोलिसांच्यात झटापट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:42 PM2024-06-25T13:42:22+5:302024-06-25T13:45:56+5:30
अभय व्हनवाडे रूकडी/माणगाव : शक्तिपीठ महामार्ग बाबत शासन दिशाभूल करत असून शासन फसवेगिरी करत आहे असा आरोप कोल्हापूर जिल्हा शक्तिपीठ ...
अभय व्हनवाडे
रूकडी/माणगाव : शक्तिपीठ महामार्ग बाबत शासन दिशाभूल करत असून शासन फसवेगिरी करत आहे असा आरोप कोल्हापूर जिल्हा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केला .ते माणगाव येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित निषेध सभेप्रसंगी बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी साजणी सरपंच शिवाजी पाटील हे होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजीटल फोटो जवळ शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या आशायाचे निवेदन ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. परंतू पोलीस प्रशासन फलक काढून घेताना झटापटीमध्ये फलक फाटला. आंदोलक गनिमी कावा करत भूमी अधिग्रहणाचे नोटीसा चे होळी केली. यामध्ये पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस नोटीस काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळ उडाला. उपस्थित शेतकऱ्यांनी शासन व शक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
फोंडे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गास मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे.महामार्ग रद्द केला नाही.शेतकर्याना भूमिहीन करणारा हा मार्ग रद्द झालाच पाहिजे.शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदार यांना शक्ती देण्याकरिता होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरपंच शिवाजी पाटील यांनी, शक्तिपीठ महामार्गामुळे साजणी या माझ्या गावातील जमिन निम्मी जाणार असून भूमिहीन होणारा हा मार्ग कशाला हवा असा संतप्त सवाल केला.
माणगाव कृती समितीचे धनपाल गवळी यांनी , शक्तिपीठ महामार्गामुळे माणगाव गावास पूराचा धोका वाढणार असून बागायती जमिनी नष्ट होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीचे शिवगोंडा पाटील,राजगोंडा बेले,राजू मुगळखोड, युवराज शेटे, सुनिल बन्ने, धन्य कुमार मगदूम, जंबूकुमार चौगुले, प्रकाश पाटील, के.डी.पाटील, अंकुश चव्हाण, सुरेश बन्ने, महावीर पाटील, बाळासाहेब गुरव, महावीर देमाण्णा, शामराव कांबळे, अभिजित देमाण्णा, संजय देमाण्णा आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाब्दिक वादावादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो समोर निवेदन ठेवण्यात येणार असल्याची कुणकुण हातकणंगले पोलीस स्टेशनला लागताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलिस फौजफाटा घेवून आंदोलन ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे फोटो ठेवू नका अशी विनंती समन्वयक फोंडे व शेतकरी यांना करताच आंदोलक व पोलीस यांच्यांत किरकोळ शाब्दिक वादावादी झाली. आंदोलन नजीक जिल्हापरिषदेच्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होताच, शेतकरी यांनी सभा थांबवून राष्ट्रगीताचा आदर राखला.