कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी, तुरुंग अधिकारी महिलेसह दोघे जखमी
By उद्धव गोडसे | Updated: February 26, 2025 18:13 IST2025-02-26T17:38:46+5:302025-02-26T18:13:03+5:30
तीन कैद्यांवर गुन्हा

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी, तुरुंग अधिकारी महिलेसह दोघे जखमी
कोल्हापूर : कळंबा कारागृहात मुलाखत कक्षाबाहेर कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. सोमवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या घटनेत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकारी स्वाती लक्ष्मण जाधवर (वय ४१, रा. शासकीय निवासस्थान, कळंबा कारागृह अधिकारी) यांच्यासह कैदी अमर सतीश माने हा जखमी झाला. जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी करण राजेंद्र पुरी, व्यंकटेश उर्फ विकी संजय जगदाळे आणि ओम मंगेश माने या कैद्यांवर गुन्हा दाखल केला.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी मुलाखत कक्षातून काही कैदी त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत होते. त्यावेळी मुलाखत कक्षातून बाहेर पडलेला कैदी अमर सतीश माने याला करण पुरी याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना सुमित स्वार्थिक कांबळे आणि सादिक जॉन पिटर हे दोघे कैदी वाद सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी व्यंकटेश उर्फ विकी जगदाळे आणि ओम माने या दोघांनी कांबळे आणि पिटर यांना मारहाण केली.
यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकारी स्वाती जाधवर यांना करण पुरी याने ढकलून खाली पाडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ तुरुंग अधिका-यांनी हाणामारी करणा-या कैद्यांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये पाठवले. तुरुंगाची शिस्त बिघडवणा-या कैद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे तुरुंग अधीक्षक विवेक झेंडे यांनी सांगितले.