Kolhapur crime: पूर्ववैमनस्यातून हाणामारी, चाकू हल्ल्यात पाच जण जखमी; पोलिसांचा लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:49 AM2023-06-22T11:49:18+5:302023-06-22T11:51:14+5:30
जखमींना उपचारासाठी दाखल केल्यानंतर सीपीआरसमोर मोठा जमाव
कोल्हापूर : येथील व्हीनस कॉर्नरवर हॉटेलसमोर झालेल्या चाकू हल्यात पाचजण जखमी झाले. शिवाजी मोरे, वैभव मोरे, आकाश वरणे (पत्ता मिळू शकला नाही.), इकबाल शेख (३८), गुडन सय्यद शेख (६५ रा. दोघेही : कदमवाडी) अशी जखमीची नावे आहेत. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी जोरदार राडा झाला. यामध्ये सीपीआरच्या काचा फुटल्या. जादा पोलिस बंदोबस्त तैनात केल्यानंतर तणाव कमी झाला. हा हल्ला व्यावसायिक आणि पूर्ववैमन्यसातून झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : व्हीनस कॉर्नरवरील एक हॉटेल आणि अंडा बुर्जी गाडा चालकांमध्ये व्यावसायिक वाद आहे. याच कारणावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता. बुधवारी रात्री याच कारणावरून जोरदार हाणामारी झाली. चाकूसह हातात मिळेल त्या हत्याराने वार केल्याने पाच जण जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी दाखल केल्यानंतर मोठा जमाव सीपीआरसमोर आला. जखमीवर उपचार सुरू होते, त्या ठिकाणी राडा घातला. प्रचंड गोंधळ सुरू झाला. यामुळे जादा पोलिस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती शांत करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही घटना नेमकी कोणत्या कारणांनी झाली. कोणा कोणामध्ये झाली, परस्पर विरोधी गट कोणते याची माहिती पोलीस घेत होते.