दहावी सीबीएसईत लख्ख यश
By Admin | Published: May 29, 2016 01:09 AM2016-05-29T01:09:07+5:302016-05-29T01:09:07+5:30
कोल्हापूरने परंपरा राखली : निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष; नेट कॅफेवर उसळली गर्दी
कोल्हापूर : दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत कोल्हापुरातील सर्व शाळांनी लखलखीत यश मिळविले. या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. शनिवारी दुपारी हा निकाल आॅनलाईन जाहीर झाला.
कोल्हापुरात कोल्हापूर पब्लिक स्कूल, शांतिनिकेतन, चाटे, पोदार आणि विबग्योर या शाळा सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार चालतात. या शाळांमधून एकूण २९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. त्यातील ५८ विद्यार्थ्यांना दहा सीजीपीए हा गुणवत्तेचा शेरा मिळाला. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या शुधाबो नंदी हा विद्यार्थी ५०० पैकी ४९७ गुण मिळवून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आला. या शाळेतील विद्यार्थी मागील कांही वर्षापासून सातत्याने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत चमकत आहेत.
शाळानिहाय निकालाची माहिती अशी : शांतिनिकेतन : १२६ (१७ जणांना सीजीपीए), कोल्हापूर पब्लिक स्कूल : एकूण विद्यार्थी ८५ (१९ सीजीपीए) विबग्योर स्कूल : ४४ (९ जणांना सीजीपीए), चाटे : ४३ (१३ जणांना सीजीपीए).
कोल्हापूरसह महाराष्ट्र विभाग या बोर्डाच्या चेन्नई केंद्रांतर्गत येतो. सीबीएसई बोर्डाने हा निकाल दुपारी दोन वाजता जाहीर होणार म्हणून सांगितले होते; परंतु बोर्डाच्या वेबसाईटला तांत्रिक बिघाड आल्याने दुपारी साडेचार वाजेपर्यंत निकाल मिळू शकला नाही. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनाही मनस्ताप झाला. सगळ्या देशभरातच मुख्य सर्व्हरला ही समस्या निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.विद्यार्थ्यांना निकालाची प्रत नंतर मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी नेटकॅफेसह शाळांमध्येही गर्दी उसळली. चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सायंकाळनंतर यशाचा आनंद पेढे वाटून व जल्लोष करून साजरा केला.