अकरावीचे नियमित वर्ग सुरू, कॉलेज कॅम्पस फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:03 PM2019-07-18T16:03:16+5:302019-07-18T16:07:45+5:30
मनात हुरहुर, गोंधळ आणि त्याचबरोबर आपण कोणतातरी मोठा पल्लाच गाठला आहे, या भावनेच्या धुंदीतच विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्गात प्रवेश केला. शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करताना अनेकांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसत होते.
कोल्हापूर : मनात हुरहुर, गोंधळ आणि त्याचबरोबर आपण कोणतातरी मोठा पल्लाच गाठला आहे, या भावनेच्या धुंदीतच विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्गात प्रवेश केला. शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करताना अनेकांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसत होते.
जुलै महिना म्हणजे नवलाई! अशा मस्त वातावरणामध्ये मोठी सुट्टी उपभोगून कंटाळलेल्या १0 वी पास विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.
कॉलेजला जाण्याची उत्सुकता कितीही असली तरी पहिल्यांदाच कॉलेजमध्ये पाऊल टाकणारे नव्या ठिकाणी कसे वागायचे, कसे बोलायचे याच्या विचाराने अगदी घाबरेघुबरे झाले होते. नवीन क्लास, नवीन लेक्चरर, नवीन मित्रमैत्रिणी, सगळे काही आनंददायक, हे चित्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. काहीजण कॉलेजच्या पहिल्या दिवशी कुणाशीही बोलत नव्हते, तर काहीजण ग्रुपने फिरत होते. काहींनी लेक्चर संपताच कॅन्टिनमध्ये जाऊन गप्पा मारणे पसंत केले.
कॉलेजचे लेक्चर संपताच काहींनी कॅन्टिनमध्ये जाऊन कॉलेजचा पहिला दिवस अविस्मरणीय केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
शाळेचा युनिफॉर्म नाही, वर्गात बसणे सक्ती नाही, असे आपल्याला आवडणारे वातावरण कॉलेजमध्ये असते; पण कॉलेजमध्ये गेल्यावर मजा असते, हे जरी खरे असले, तरी कॉलेजच्या पाच वर्षांतच आपले उज्ज्वल भविष्य ठरत असते. शाळा हा पाया, तर कॉलेज हे आपल्या करिअरची इमारत असते. आपले करिअर बनविण्याची हीच खरी वेळ असते.
ही पाच वर्षे कधी जातात, हे कळतही नाही, म्हणून कॉलेज लाइफ एन्जॉय करत असताना आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या करिअरचा विसर पडू देऊ नका. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत खूप एन्जॉय करा; पण आपल्या शिक्षणाची इमारत मजबूत बनवा, अशा शुभेच्छा आज प्रत्येक महाविद्यालयात प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
फर्स्ट इम्प्रेशन
कॉलेजच्या पहिल्या दिवशी सगळेच अप टू डेट आले होते. फर्स्ट इम्प्रेशन पडावे, याची धडपड प्रत्येकजण करत होते. खास पहिल्या दिवशी घालण्यासाठी अनेकांनी नवे कपडे खरेदी केले होते. अशा नवलाईचे वातावरण सर्वत्र पाहण्यास मिळत होते.
यात्रेचे स्वरूप
आपल्या पाल्यांना अनेक पालक महाविद्यालय परिसरात सोडण्यासाठी आल्याने बुधवारी महाविद्यालय परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक विद्यार्थी हे दबकत दबकत महाविद्यालयात प्रवेश करत होते.
कॉलेजचा पहिला दिवस हा माझ्यासाठी खूपच आनंददायी ठरला. कॉलेजला जाण्याची व बसच्या प्रवासाची ही माझी पहिलीच वेळ होती. कॉलेजमध्ये मला नवीन मित्र भेटले. नवीन शिक्षकांची ओळख झाली. कॉलेजचे नियम व शिस्त पहिल्याच दिवशी शिक्षकांनी सांगितले. त्याचबरोबर नवीन विषयांशी नाते जोडले गेले. अशाप्रकारे कॉलेजचा पहिला दिवस खूप छान गेला.
- सिद्धेश पाटील,
डी.डी. शिंदे सरकार कॉलेज, कला शाखा
कॉलेजच्या पहिल्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. कॉलेज म्हणजे एक वेगळे विश्वच हे माझ्या मनात ठाम होते. एकूणच आमचा अभ्यासक्रम आणि कॉलेजची सगळी धमाल आणि मजा मी पहिल्याच दिवशी घेतली. नवीन वातावरणासह नवीन अभ्यासक्रमांची ओळख झाली. माझे व माझ्या कॉलेजचे एक वेगळेच जिव्हाळ्याचे नाते तयार झाले.
सृष्टी पाटील,
विवेकानंद महाविद्यालय, कॉमर्स शाखा
दहावी संपल्यावर कधी एकदा कॉलेज लाइफ सुरू होते, असे वाटत होते; मात्र जरा भीती वाटत होती. ओळखीचे असे कोणीच नव्हते; पण तरी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी खूप चांगल्या मित्र-मैत्रिणी मला मिळाल्या. कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे लेक्चर फारसे झाले नाही; पण खूप चांगले फ्रेंडस मला मिळाले.
- देविका वणकुंद्रे,
एस. एम. लोहिया, विज्ञान शाखा