पाचवी ते बारावीचे वर्ग सकाळी गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:43+5:302021-03-16T04:23:43+5:30
कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून माध्यमिक शाळा सकाळी साडेसात ते दुपारी बारा यावेळेत भरल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी दिनांक १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू होतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सकाळ सत्रातील शाळा सोमवारपासून भरविण्यात आल्या. सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थी शाळेत येऊ लागले. त्यानंतर अर्ध्या तासामध्ये शाळांचा परिसर गजबजून गेला. प्रार्थना होऊन वर्ग भरले, त्यानंतर वेळापत्रकानुसार विविध विषयांचे तास घेण्यात आले. दुपारी बारा वाजता शाळा सुटली. जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसणे आरोग्याच्यादृष्टीने त्रासदायक ठरणार होते. त्याचा विचार करून आणि विविध शिक्षक संघटनांनी केलेल्या विनंतीनुसार सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात आल्या. बहुतांश पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी आले होते. माध्यमिक शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचे परिपत्रक शनिवारी काढले. त्यामुळे काही शाळांना विद्यार्थ्यांना त्याबाबत सूचना देता आली नाही. या शाळांनी सोमवारी विद्यार्थ्यांना सूचना दिली असून, त्यातील काही शाळांनी आज (मंगळवार), तर काहींनी बुधवार (दि. १७)पासून सकाळी वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे.
चौकट
प्राथमिक शाळा आजपासून सकाळी
जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आज (मंगळवार)पासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. त्याबाबतची सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना पत्रकाव्दारे सोमवारी दिली. जिल्ह्यात अशा १,९७६ शाळा असून, विद्यार्थी संख्या सुमारे ६० हजार आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून माध्यमिक शाळांनी सकाळच्या सत्रात वर्ग भरविले आहेत. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना शाळांना केली आहे.
- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
- सागर वातकर, शिक्षक, उषाराजे हायस्कूल
मी दहावीच्या वर्गात शिकत आहे. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यामध्ये सकाळी वर्ग भरणे आम्हाला अभ्यासाच्यादृष्टीने उपयुक्त आहे. सकाळी वातावरण चांगले असते. त्यामुळे अभ्यासही चांगला होतो.
- सेजल सुतार, विद्यार्थिनी, विश्वकर्मा नगर, उजळाईवाडी.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : १०५०
विद्यार्थी संख्या : २ लाख ५० हजार