कोरोनामुक्त गावांमध्ये आजपासून आठवीनंतरचे वर्ग भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:50+5:302021-07-15T04:18:50+5:30
कोल्हापूर : कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवारपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांतील वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने ...
कोल्हापूर : कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवारपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांतील वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी वर्ग भरविण्यात येणार आहेत. शहरातील कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होण्याची प्रतीक्षा येथील शाळांना लागली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील १०५४ शाळांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करीत प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्याची तयारी ९४३ शाळांनी दर्शविली असून, त्याबाबत शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यामध्ये अनुदानित शाळांची संख्या ६७७ इतकी आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शविलेल्या शाळांनी पालकांकडून संमतीपत्रे घेतली आहेत. या शाळांना कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ग्रामीण भागातील शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सद्य:स्थितीमध्ये मुख्याध्यापकांनी शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज कोणत्या पद्धतीने करावे याबाबत शिक्षण विभागाच्या वतीने स. म. लोहिया हायस्कूलच्या गडकरी सभागृहात सहविचार सभा घेण्यात आली. त्यामध्ये उपशिक्षणाधिकारी डी. एस. पोवार, बी. एम. किल्लेदार, गजानन उकीरडे, अजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, कोल्हापूर शहरातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याची तयारी असणाऱ्या शाळांची संख्या १०७ इतकी आहे. मात्र, शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची प्रतीक्षा या शाळांना लागली आहे. वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यास शिक्षक आणि शाळा उत्सुक आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची प्रतीक्षा शाळांना आहे, अशी प्रतिक्रिया दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी व्यक्त केली.
चौकट
शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षांच्या तारखा जाहीर
शिवाजी विद्यापीठाकडून कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रामध्ये एकूण ४३५ परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात एमसीक्यू पद्धतीने होणार आहेत. या परीक्षांच्या तारखा बुधवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या.