पाचवी ते आठवीचे वर्ग उद्यापासून दोन सत्रांमध्ये भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:31+5:302021-02-05T07:11:31+5:30
कोल्हापूर : शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार (दि. २७) पासून दोन सत्रांमध्ये भरणार ...
कोल्हापूर : शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार (दि. २७) पासून दोन सत्रांमध्ये भरणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळांमधील शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था आदी स्वरूपातील तयारी शाळांकडून करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि लसीकरणाची सुरूवात करण्यात आल्याने शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तब्बल दहा महिन्यांनंतर बुधवारपासून हे वर्ग सुरू होतील. शाळेच्या वेळेत वर्ग भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात बहुतांश शाळांनी सकाळी आठ ते अकरा आणि सकाळी अकरा ते दुपारी दोन या सत्रांमध्ये वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे. पालकांची संमतीपत्रे असलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था असणार आहे. वर्ग सुरू होण्यापूर्वी संबंधित शाळेतील किमान एका तरी शिक्षकाची आरटीपीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे. वर्ग सुरू करण्याबाबत काही शाळांनी पालकांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेऊन वर्ग सुरू करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सोमवारी दिली.
चौकट
तपासणी केंद्रांअभावी अडचण
इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग हे दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्याने माध्यमिकच्या बहुतांश शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी त्यावेळी पूर्ण झाली आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गांच्या ५०३६ शिक्षकांची चाचणी होणे बाकी आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर चाचणीसाठीची सहा केंद्रे कार्यान्वित आहे. त्याची क्षमता लक्षात घेता, ही केंद्रे कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांची अडचण होणार असल्याचे चित्र आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात...
शाळांची संख्या : १०५४
शिक्षकांची संख्या :१२६२९
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या : २,३१,९९६