इचलकरंजीत शास्त्रीय शैलीतील नृत्य कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:19+5:302020-12-12T04:40:19+5:30
इचलकरंजी : येथील पदन्यास नृत्यकला अकादमी व रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने ‘शास्त्रीय नृत्यांजली’ हा कथ्थक आणि भरतनाट्यम शैलीमधील ...
इचलकरंजी : येथील पदन्यास नृत्यकला अकादमी व रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने ‘शास्त्रीय नृत्यांजली’ हा कथ्थक आणि भरतनाट्यम शैलीमधील शास्त्रीय-निमशास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. सादरीकरणामध्ये पदन्यासच्या विविध वयोगटांतील विद्यार्थिनींनी देवीस्तोत्र आणि भक्तिगीतांवर तालबुद्ध नृत्याविष्कार सादर केले.
सुरुवातीला अध्यक्ष संजयसिंह गायकवाड यांनी नटराज प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमातील सर्व नृत्यांसाठी दिग्दर्शन सायली होगाडे यांनी केले. पंचतुंड नररूंड माल धर ही नांदी, अंगीकम भुवनम ही शिववंदना, हे गजवदना हे गणेशस्तोत्र आणि भरतनाट्यम शैलीमधील अलारिपू सादर करण्यात आला. तसेच जग में सुंदर है दो नाम, नमो देवी, श्रीकृष्ण वंदना व अष्टपदी ही नृत्ये कथ्थक शैलीत सादर करण्यात आली. शेवटी सरगम हा वेगळा नृत्याविष्कार, पग घुंगरू बांध मीरा नाची हे भजन व रामस्तुती आणि तराणा हे कथ्थकमधील नृत्य सादर करण्यात आले.
संजय होगाडे यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. प्रशांत कांबळे, चित्कला कुलकर्णी, सायली होगाडे, ज्योती सांगले, आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम दगडूलाल मर्दा रोटरी मानव सेवा केंद्र सभागृहात पार पडला.
(फोटो ओळी)
नृत्यांजली कार्यक्रमात ‘पग घुंगरू बांध मीरा नाची’ नृत्य सादर करताना विद्यार्थिनी.