वर्गमित्रांनी निराधार कुटुंबाला दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:37+5:302021-06-05T04:17:37+5:30
कुटुंबातील कर्ता शिवाजी मोहन कुंभार (मिस्त्री) यांच काही दिवसापूर्वी आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांचे ...
कुटुंबातील कर्ता शिवाजी मोहन कुंभार (मिस्त्री) यांच काही दिवसापूर्वी आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांचे कुटुंब निराधार झाले. अशा संकटकाळात कुटुंबीयांना धीर देत शिवाजीच्या जिवा -भावाच्या वर्गमित्रांनी त्यांच्या कुटुंबीयांना एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
शिवाजी सायकल दुरुस्ती व छोटी मोठी कामे करून संसाराचा गाडा हाकत अशातच अचानक वयाच्या ३३ वर्षी 'शिवा मिस्त्री'चे आकस्मिक निधन झाले. हातावरचे पोट असणाऱ्या कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शिवाची पत्नी व दोन लहान मुले निराधार झाली. देवठाणे येथील शिवाचा वर्गमित्र प्राथमिक शिक्षक सुभाष देसाई यांनी वर्गमित्रांना कुंभार कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. कसबा ठाणे व महाडिकवाडी येथील वर्ग मित्रांनी २१ हजार रुपये गोळा करून कुंभार यांच्या पत्नीकडे सुपूर्द केले. तसेच सुभाष देसाई व नवनाथ पाटील यांनी कुंभार यांच्या पाचवीत शिकणारी मुलगी व दुसरीत शिकणाऱ्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामासारखी असावी कधीही न तुटणारी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही न विसरणारी असावी. हे कुंभारच्या वर्गमित्रांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
यावेळी माजी सरपंच रावजी पाटील, ग्रा. पं. सदस्य बळवंत कुंभार, अरुण परीट, रायसिंग कांबळे, विजय कुंभार, विश्वास पाटील, बाबासाहेब मिसाळ, अवधूत महाडिक, सचिन पाटील, नितीन महाडिक उपस्थित होते.
फोटो ओळ : देवठाणे येथील शिवाजी कुंभार यांच्या पत्नीला २१ हजार रुपये देताना सुभाष देसाई, रावजी पाटील, अरुण परीट.