स्वच्छ, सुंदर मलकापूरप्रती सामाजिक बांधीलकीचे कोंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:03 AM2018-01-01T00:03:03+5:302018-01-01T00:03:48+5:30
आर. एस. लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ-सुंदर मलकापूरचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. यातून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडते. समाजाचे आम्ही काही देणं लागतो या भावनेतून कार्यरत मंडळीची मोट बांधून सहकारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट, शिक्षक-विद्यार्थी, तरुण मंडळे व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून स्वच्छ मलकापूरचे स्वप्न आकारत आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून नगरीचा चेहरामोहरा बदलत आहे. प्रशासनाने दानशूर मंडळींचा मेळ घालीत सामान्य नागरिकांचा प्रतिसाद मिळवीत मलकापूरच्या मुख्याधिकारी अॅलिसा पोरे व त्यांच्या व्यवस्थापन टीमने मलकापूरच्या सुंदरतेचा ध्यास घेतला आहे.
पथनाट्य, पॉपलेट व पुस्तिकाद्वारे स्वच्छतेचा मंत्र प्रत्येकाच्या उंबरºयापर्यंत पोहोचवीत, काटेकोर नियोजनाची अंमलबजावणी, वेळीच कचºयाचा उठाव व कचरा विघटन या टप्प्याने स्वच्छतेची वीण घट्ट बनत आहे.
येथील बँक आॅफ महाराष्ट्र, एच.डी.एफ.सी, अर्बन बँक, वैश्य नागरी बँक, आय.डी.बी.आय. बॅक यांच्या आर्थिक सहकार्यातून नगरीतील चौदाशे कुटुंब तसेच दुकानदार, शाळा, सार्वजनिक कार्यालयांना डस्टबिन पुरविल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या आठ स्टँड बॉक्समधून चौक व गल्लीतील कचरा जमविला जातो. निर्माल्य हंड्याची सुविधा आहे. तीन ठिकाणी बायोगॅस युनिट बसवून कचºयातून इंधन निर्मिती केली जाते. पूर्वी कचराकुंडी व त्याबाहेरील कोंडावळे व दुर्गंधी हे चित्र आता बदलले आहे.
दररोज चारशेच्या दरम्यान अॅपवरील सूचना हाताळल्या जातात. घरातल्या कचºयाची निर्गत दोन घंटा गाडी, एक ट्रॅक्टर व एक मैला टँकरद्वारे दैनिक स्वच्छता होते. सकाळी सहा ते दहा व सायंकाळी असे दोन वेळात या वाहनांद्वारे नगरीतील सुमारे दीड ते पावणेदोन टन कचरा जमवून, थेट उचल करून येथील कचरा विघटन प्रकल्पात प्रक्रियेसाठी जातो. तेथे दररोज सहा कामगार व एक जेसीबी मशीनद्वारे ओला व सुका कचरा तसेच प्लास्टिक काचा, लोखंड यांची वर्गवारी होते. गेल्या चाळीस वर्षांत येथील कचरा डेपो हजारो टनांचा कचरा घेऊन जातो. मात्र, स्क्रीन स्कॅनरने दररोज कचºयाचे व्यवस्थापन केले जात आहे व त्याचे विघटन होत आहे. यातून दररोज ७०० किलो सेंद्रिय खत तयार होते. हे खत प्रति गाडी ६३० रुपयांनी शेतकºयांना उपलब्ध केले आहे. गेल्या दीड महिन्यात दीड लाख रुपये उत्पन्न पालिके ला खतातून मिळाळे. हा निधी स्वच्छतेच्या उपक्रमात सातत्य राखण्यास सोईचा ठरत आहे. शुक्रवार व मंगळवारी बाजार संपताच रात्रीत सारे शहर स्वच्छ करणारी खास यंत्रणा राबते. सांडपाण्याच्या व्यवस्थेने जलप्रदूषण रोखले जाते.
प्रोत्साहन निधी व १४ व्या वित्त आयोगातून ७० कुटुंबांना शौचालय बांधण्यास निधी दिला आहे. सहा विभागांतून दोन कुटुंबात एक शौचालय युनिट उपलब्ध केले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालयाच्या दुरुस्तीसाठी कृष्णा पाटील, राजेश लाड, विजय भिंगार्डे, राकेश गायकवाड, शंतनू कोठावळे, पॅटसन कोल्हापूर यांनी साठ हजारांवर देणगी दिली आहे. समाज संपर्कातील रूपेश वारंगे, विनायक हिरवे, आबा पडवळ या स्वच्छता दुतासह व मेघा स्वामी या समन्वयक संपर्क भेटीद्वारे जागृती करीत आहेत. स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉटेल यांची निवड करून प्रोत्साहनात्मक स्पर्धा रुजविली जात आहे. अभ्यास दौरा, विविध स्पर्धा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्पिकरवरील प्रचार, वर्धापन दिन, खाद्य महोत्सव, वाचनालयाची व्याख्यानमाला या निमिताने स्वच्छ मलकापूरचा संदेश रुजविण्यावर भर दिला आहे.
वर्धापनदिनी कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या महिला कलाकारांनी सामाजिक प्रश्नावर नाटिका सादर करून महिला, बचत गट व विद्यार्थिनी यांच्यात जागृती घडविली.
प्लास्टिक पिशवी बंद
प्लास्टिक पिशवी बंदीचा प्रारंभ नगरीतील स्टॉलधारकांनी केला. प्लास्टिक बंद करताना कागदी व कापडी पिशव्या पुरविणारी समांतर व्यवस्था उभी केली आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांना तसे प्रशिक्षण देऊन या पिशव्यांचा वापर रुजविला आहे, तर प्लास्टिक बाटली क्रश करणारे मशीन बसवून दररोज बाजार, स्टँड, महामार्ग, नदीपात्र ते घर दरम्यान पडणारी बाटली जमवून मशीनद्वारे बारीक तुकड्यात रूपांतरित केली जाते.
स्वच्छता दैनंदिनी गरज
स्वच्छतेची ही मोहीम न राहता ही नागरिकांची दैनंदिन बाब बनावी हे उद्दिष्ट ठेवूनच स्वच्छतेचा उपक्रम राबवत असल्याचा विश्वास नगराध्यक्ष अमोल केसरकर व मुख्याधिकारी अॅलिसा पोरे यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, बांधकाम सभापती प्रवीण प्रभावळेकर व नगरसेवकाचे नियंत्रण मोलाचे ठरत आहे.