स्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूर शहराची १६ व्या स्थानी झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 10:59 AM2019-03-07T10:59:48+5:302019-03-07T11:06:16+5:30

गेल्या तीन-चार वर्षांत कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सामूहिकरीत्या व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र शासन आयोजित सन २०१८-१९ मधील स्वच्छ शहर सर्वेक्षणात गुणानुक्रमे १६ वा क्रमांक मिळविला आहे. तर राज्यात दुसरे स्थान मिळविले.

A clean survey of Kolhapur city rose 16th place | स्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूर शहराची १६ व्या स्थानी झेप

स्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूर शहराची १६ व्या स्थानी झेप

Next
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूर शहराची १६ व्या स्थानी झेप‘स्वच्छ शहर’ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर : राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

कोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांत कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सामूहिकरीत्या व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र शासन आयोजित सन २०१८-१९ मधील स्वच्छ शहर सर्वेक्षणात गुणानुक्रमे १६ वा क्रमांक मिळविला आहे. तर राज्यात दुसरे स्थान मिळविले.

गतवर्षी ७४ वा क्रमांक आला होता. त्यावेळी राहून गेलेल्या चुका, प्रयत्नातील उणिवांमध्ये सुधारणा करीत महापालिकेने १६ व्या स्थानावर मजल मारली आहे. महानगरपालिकेच्या दृष्टीने ही भूषणावह बाब मानली जात आहे.

पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील  कोल्हापूर शहर हे प्रमुख शहर मानले जाते. या शहराचा भौगोलिक विस्तार झाला नसला तरी मिळणाऱ्या सुविधांमध्ये बऱ्याच मोठ्या सुधारणा होत आहेत. विशेषत: शहर स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिका आरोग्य प्रशासन अधिक जागरूक तसेच तत्पर होत आहे. स्वच्छतेबाबत शहरवासीयांमध्ये प्रबोधन करीत प्रशासनाने आपली यंत्रणाही तितकी गतिमान ठेवल्यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत झाली आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात कोल्हापूर महानगरपालिकेस २०१६-१७ सालात १५८ वा क्रमांक, तर २०१७-१८ सालात ७४ वा क्रमांक मिळाला होता. २०१८-१९ सालात वरचा क्रमांक पटकावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने यंदा चांगलीच तयारी केली होती. मागच्या वर्षातील चुका व उणिवा शोधून त्यात सुधारणा केली आणि सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळेच २०१८-१९ सालात १६ व्या क्रमांकापर्यंत मजल मारता आली.

कोल्हापूर शहरात घरोघरी घंटागाडी जाते. संकलित केलेला कचरा डंपिंग ग्राउंडवर पाठविला जातो. त्याची गेल्या दोन महिन्यांपासून शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावली जाते. कचरा प्रक्रिया केंद्र कार्यक्षमपणे काम करीत आहे.

कचरा टाकण्याकरिता टाकाळा खण येथे लॅँडफिल साईट विकसित केली आहे. वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढविण्यावर अधिक भर दिला. त्याला अनुदान दिले. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, देखभाल व स्वच्छता यांवर विशेष लक्ष दिले.

मुख्य रस्त्यावरील कचरा उठाव करण्याकरिता मशिनरी घेतली आहे. कंटेनरची संख्या वाढविली आहे. वाहतुकीची यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी अ‍ॅप तयार केले असून त्यावर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाते. स्वच्छतेकरिता होर्डिंग, फलक लावले आहेत.

या सर्वांची दखल घेऊन केंद्र सरकारने महापालिकेला १६ क्रमांक दिला आहे. देशभरातील ४५०० शहरांचा या स्पर्धेत सहभाग होता. केंद्र सरकारच्या पथकाने प्रत्यक्ष शहरात येऊन शहराची पाहणी केली होती.

 

पहिल्या दहामध्ये येण्याचा प्रयत्न करू
शहर स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही घेत असलेल्या परिश्रमाचे आज खºया अर्थाने कौतुक झाले आहे. आम्ही पुढील वर्षी देशपातळीवर पहिल्या दहा शहरांत समावेश होण्याकरिता प्रयत्न करु. आमच्याकडे निधीची कमतरता नाही. त्यामुळे पुढील वर्षभरात आणखी चांगले काम करून दाखवू. लवकरच आम्ही कचरा उठावासाठी १५० आॅटो रिक्षा खरेदी करणार आहोत.
- डॉ. विजय पाटील ,
मुख्य आरोग्य निरीक्षक

कोल्हापूरला भूषणावह
स्वच्छतेबाबत देशपातळीवर कोल्हापूर शहराचा गौरव होणे ही शहरवासीयांच्या दृष्टीने भूषणावह काम आहे. कोल्हापूरचे नागरिक जागरूक आहेत. त्यांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळेच ही गोष्ट साध्य झाली आहे. जनतेचे तसेच कर्मचाऱ्यांचे अभिनंदन! पुढील काळातही असेच सहकार्य मिळावे, ही अपेक्षा आहे.
सरिता मोरे, महापौर

मेहनतीचे यश
स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी मेहनत घेतली. विशेषत: उपायुक्त मंगेश शिंदे व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचे हे यश आहे असे मी मानतो. सर्वजण कौतुकास पात्र आहेत.
- डॉ. अभिजित चौधरी,
माजी आयुक्त

मान्यवर शहरांच्या यादीत कोल्हापूर

स्वच्छ सर्वेक्षणात इंदोर पहिल्या स्थानावर आहे. या क्रमवारीत अम्बीकापूर, म्हैसूर, उज्जैन, नवी दिल्ली, अहमदाबाद, नवी मुंबई, तिरूपती, राजकोट, देवास, भिलाईनगर, विजयवाडा, गाझियाबाद, सुरत, जमशेदपूर आणि त्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो. देशपातळीवरील मान्यवर शहरांच्या यादीत कोल्हापूर शहराचा समावेश झाला असल्याने आरोग्य विभागाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
 

 

Web Title: A clean survey of Kolhapur city rose 16th place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.