महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांनी राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:16 PM2019-09-30T17:16:56+5:302019-09-30T17:26:02+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महास्वच्छता अभियानामध्ये तेविसाव्या रविवारी शहरातील पंचगंगा नदीघाट, रंकाळा तसेच जयंती नाल्याच्या काठावर स्वच्छता केली. या अभियानात एक दिवसात १२० टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महास्वच्छता अभियानामध्ये तेविसाव्या रविवारी शहरातील पंचगंगा नदीघाट, रंकाळा तसेच जयंती नाल्याच्या काठावर स्वच्छता केली. या अभियानात एक दिवसात १२० टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. या मोहिमेकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या वतीने पद्माराजे गार्डन येथे व यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल येथे स्वच्छता मोहीम राबविली. स्वरा फौंडेशनच्या वतीने रिलायन्स मॉलमागील परिसराची स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उद्यान, पवडी, आरोग्य विभाग व गडकोट किल्ला संवर्धन समितीच्या वतीने बिंदू चौक येथील तटबंदीवरील झाडेझुडपे काढून तटबंदीची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता केल्यातंतर रोगराई पसरू नये यासाठी या परिसरात धूर व औषध फवारणी करून ब्लीचिंग पावडर टाकण्यात आली.
पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, शाखा अभियंता आर. के. पाटील, सहायक उद्यान अधीक्षक अर्पणा जाधव, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, केआयटी कॉलेजचे डायरेक्टर डॉ. व्ही. व्ही कार्जिन्नी, विभागप्रमुख मोहन चव्हाण, प्राध्यापक शीतल वरूर, व्ही. ए. स्वामी, गुरुप्रसाद चव्हाण, कोआॅर्डिनेटर आदित्य आचरेकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे बाबा साळोखे, सचिन पाडव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक सुशांत कावडे, मनोज लोट, शुभांगी पोवार, माधवी मसूरकर, शिवाजी शिंदे, मुनीर फरास, अरविंद कांबळे, शिवाजी शिंदे, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, पारस ओसवाल, राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
स्वच्छता मोहिमेची ठिकाणे
पंचगंगा नदीघाट परिसर, रंकाळा शाहू स्मृती गार्डन, टेंबलाई मंदिर, यल्लमा मंदिराचा परिसर, जयंती नाला संप आणि पंप हाऊस, रिलायन्स मॉलमागे, फोर्ड कॉर्नर व पाचगाव परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
विशेषत: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा हातभार
विवेकानंद कॉलेज एनसीसी व एन.एस.एस.चे ५० व केआयटी कॉलेजचे २५ विद्यार्थी-विद्यार्थिनी, गोखले कॉलेज एनएनएस, एनसीसीचे ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी, यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजचे ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल व अॅग्रिकल्चर कॉलेजचे ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी, यशवंतराव चव्हाण कॉलेजचे ४० व स्वरा फौंडेशनचे १० कार्यकर्ते यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.
महापालिका यंत्रणा
- जीसीबी : ५
- डंपर : ५
- आर.सी. गाड्या : ११
- महापालिकेचे कर्मचारी : १५०.