जिल्हाधिकारी कार्यालयाची स्वच्छता सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:39+5:302021-07-27T04:26:39+5:30
कोल्हापूर : गेले तीन दिवस पुराच्या पाण्याने वेढलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी आता ओसरले आहे. सध्या येथील साफसफाई सुरू असून, ...
कोल्हापूर : गेले तीन दिवस पुराच्या पाण्याने वेढलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी आता ओसरले आहे. सध्या येथील साफसफाई सुरू असून, कार्यालयातून कामकाज सुरू व्हायला आणखी तीन-चार दिवस लागणार आहेत.
अवघ्या जिल्ह्याचा कारभार ज्या कार्यालयातून चालतो ते नागाळा पार्क येथील जिल्हाधिकारी कार्यालयच पुराच्या पाण्याने वेढले होते. मात्र, यंदाची परिस्थिती २०१९पेक्षा बरीच होती. त्यावेळी पुराचे एवढे पाणी येईल, याचा अंदाज नसल्याने सगळे दफ्तर पाण्याने भिजले होते. कार्यालयातील फर्निचरपासून सगळ्या साहित्याची दैना झाली होती. यावेळी दोन वर्षांपूर्वीचा अनुभव गाठीशी होता, त्यामुळे शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी सर्व दफ्तर वरच्या मजल्यावर नेवून ठेवले. हा पसारा आवरेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आणि कर्मचाऱ्यांना बोटीतून बाहेर आणावे लागले. महत्त्वाची कागदपत्रं, संगणक यासह शासकीय कामकाजासाठी लागणारे साहित्य जिल्हा परिषदेत हलवावे लागले. पुराच्या काळात आणि अजूनही जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेतून कामकाज करत आहेत तर कर्मचारी त्या-त्या दिवशी महत्त्वाचे काम करायला येथे येत आहेत.
रविवारी कार्यालयातील पुराचे पाणी ओसरल्याने सोमवारपासून साफसफाईला सुरुवात झाली आहे. पण अजून वीज नाही, कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी लागणारी यंत्रणा, फर्निचर या सगळ्या बाबींची पूर्तता होईपर्यंत आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच येथील स्थिती पूर्ववत होऊन कामकाजाला सुरुवात होईल.
----