मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 01:23 PM2022-02-25T13:23:35+5:302022-02-25T13:24:34+5:30
गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली.
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनस्थळ परिसरात मोठी अस्वच्छता आहे. महावितरण कार्यालयासमोर ज्या ठिकाणी आंदोलनासाठी मंडप उभा करण्यात आला आहे त्या परिसरात कचऱ्याचा ढिग पडला आहे. प्रशासनाला याकडे बघायला वेळ नाही. मात्र आज, शुक्रवारी आंदोलनस्थळी राजू शेट्टींना भेटण्यासाठी मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री येणार म्हटल्यावर हा परिसर चकाचक करण्यात आला.
शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसूली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेली चार दिवस ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. माजी खासदार राजू शेटटी या आंदोलनस्थळी गेली चार दिवसापासून रात्र अन् दिवस ठाण मांडून बसले आहेत. रात्री आंदोलनस्थळीच शेट्टी झोपल्याने त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मात्र, त्यांच्या आंदोलनाच्या मंडपाशेजारीच कच-याचा ढिग गेल्या चार दिवसापासून तसाच होता. यामुळे याठिकाणी डास तसेच दुर्गंधी होती. मात्र यांची परवा न करता शेट्टीसह कार्यकर्ते याठिकाणी ठाण मांडून आहेत. आज या आंदोलनस्थळी जिल्ह्यातील मंत्री भेट देणार असे कळल्यानंतर यंत्रणेने सर्व परिसराची स्वच्छता करण्यास सुरवात केली.
गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली.