पुणे मनपाकडून शिये गावात स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:00+5:302021-08-02T04:10:00+5:30
पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिये गावाला मोठा फटका बसला आहे. पूर ओसरल्यानंतर सफाईचा मोठा प्रश्न उभा राहतो. अशावेळी ग्रामपंचायतच्या ...
पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिये गावाला मोठा फटका बसला आहे. पूर ओसरल्यानंतर सफाईचा मोठा प्रश्न उभा राहतो. अशावेळी ग्रामपंचायतच्या मदतीला पुणे महापालिका धावून आली असून त्यांच्या आरोग्य विभागाच्या पथकाने गावात स्वच्छता मोहीम राबवली.
पुरामुळे शियेच्या संपूर्ण गावभागात पाणी पसरले होते. गावातील सुमारे सातशे कुटुंब स्थलांतरित झाली होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर गावात स्वच्छतेचा प्रश्न मोठा जटिल बनला होता. ग्रामपंचायतने पुढाकार घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वच्छता करुन घेतली होती. शनिवारी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे ३० कर्मचाऱ्यांचे पथक शियेकरांच्या मदतीसाठी आले. त्यांनी नदी वेस रस्ता, स्मशानभूमी आणि श्रीरामनगर रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवली. पुणे मनपाचे आरोग्य निरीक्षक मुकुंद कुलकर्णी व मुकादम श्रीकांत मते यांनी याचे नियोजन केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
पुणे मनपाने केलेल्या मदतीबद्दल सरपंच रेखा जाधव, उपसरपंच शिवाजी गाडवे आणि सदस्यांनी त्यांचे आभार मानले.
फोटो : शिये (ता. करवीर) येथे पुण्याच्या स्वच्छता पथकासोबत जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, ग्रा. पं. सदस्य विलास गुरव, प्रभाकर काशिद, ग्रामसेवक रमेश कारंडे तसेच संजय सातपुते, अनिल कांबळे.