महास्वच्छता मोहीम : मुसळधार पावसातही स्वच्छता मोहिमेचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:33 AM2019-07-01T11:33:34+5:302019-07-01T11:36:33+5:30
मुसळधार पाऊस पडत असतानाही रविवारी महास्वच्छता मोहिमेस खंड पडला नाही, उलट सहभागी झालेल्या नागरिक व कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्साहाने चिखलात मोहिमेला हातभार लावला. सकाळी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. लोकसहभागातून ही मोहीम राबविली जात आहे.
कोल्हापूर : मुसळधार पाऊस पडत असतानाही रविवारी महास्वच्छता मोहिमेस खंड पडला नाही, उलट सहभागी झालेल्या नागरिक व कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्साहाने चिखलात मोहिमेला हातभार लावला. सकाळी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. लोकसहभागातून ही मोहीम राबविली जात आहे.
रविवारी सकाळी संप आणि पंप हाऊस येथे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते महास्वच्छता मोहिमेस व वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला. उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून या मोहिमेत काम पाहिले. आयुक्तांनी न्यू कॉलेज सीटीओ एन. सी. सी. ५, महाराष्ट्र बटालीयनचे विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि पाय रुतणाऱ्या चिखलात ही मोहीम राबविली.
उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा. आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, नारायण भोसले, आर. के. पाटील, परवाना अधीक्षक राम काटकर, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत पाटील, दिलीप देसाई, दिलीप पोवार, पारस ओसवाल, उदय गायकवाड, अनिल देसाई, अजय कोराणे व महापालिकेच्या सर्व विभागाकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३00 कर्मचारी, अधिकारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मोहिमेत सहभाग
न्यू कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग, क्रिडाईचे सदस्य, आर्किटेक असोसिएशनचे सदस्य, तनिष्का महिला ग्रुप, स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, राजोपाध्येनगर येथील अंध युवक मंच (हणबरवाडी)चे विद्यार्थी, विद्यार्थिनी, आदींचा सहभाग लाभला.
सहा महिन्यांत जयंती नाल्याची बनणार नदी
येत्या सहा महिन्यांत जयंती नाल्याचे प्रदूषित पाणी शुद्ध कसे राहील, यातून या नाल्यास नदीचे पूर्ववत स्वरूप आणण्याचा प्रयत्न आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेले नऊ रविवार अथकपणे महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, समाजसेवी संस्था, नागरिकांच्या माध्यमातून जयंती नाल्याची टप्प्या-टप्प्याने स्वच्छता मोहीम सुरू आहे. जयंती नाल्याचे रूपांतर जयंती नदीमध्ये होत आहे.
वृक्षारोपण अन् अंध विद्यार्थ्यांचा सहभाग
न्यू कॉलेज सीटीओ एन. सी. सी. ५, महाराष्ट्र बटालीयनचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी स्वच्छता करून जयंती नदीच्या दोन्ही बाजूस बांबूच्या झाडांची रोपे लावली. रिलायन्स मॉलच्या पिछाडीस अंध युवक मंचच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वच्छतेत सहभाग नोंदविला.
आठ ठिकाणी स्वच्छता मोहीम
हॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागील बाजूस ते रिलायन्स मॉल पिछाडीस, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, संप आणि पंप हाऊस ते सिद्धार्थनगर, सिद्धिविनायक गणपती मंदिर पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमलगत दफनभूमी, या जयंती नाल्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्वांना हँडग्लोज पुरविण्यात आले.