स्वच्छता अभियानामुळे ‘झाडू’लाही अच्छे दिन !
By Admin | Published: November 17, 2014 12:04 AM2014-11-17T00:04:18+5:302014-11-17T00:27:09+5:30
विक्रीत दहा टक्क्यांनी वाढ : दर दिवशी कोल्हापुरात सुमारे ३० ते ४० हजार रुपयांची विक्री
संतोष मिठारी -कोल्हापूर --विविध शासकीय कार्यालये, शाळा, खासगी कंपनी, स्वयंसेवी संस्था या मोहीम, सप्ताहाचे नियोजन करून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवित आहेत. या अभियानाने विविध कार्यालये, शाळांचा परिसर, रस्ते एकीकडे चकाचक होत आहेत, तर दुसरीकडे झाडूच्या (खराटा) बाजारपेठेला तेजी आली आहे. अभियानामुळे गेल्या दीड महिन्यांपासून कोल्हापुरातील खराट्यांची विक्री सरासरी दहा टक्क्यांनी वाढली आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर ‘आप’मुळे झाडू अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर आता पुन्हा शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातात झाडू दिसत आहे. निमित्त ठरत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘स्वच्छ भारत’ अभियानाची हाक. या अभियानात शासकीय व खासगी कार्यालये, कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था मोहीम, सप्ताह आयोजित करून आपापली कार्यालये, शाळा, संस्थांचा परिसर, रस्ते चकाचक करत आहेत.
आरोग्य राखण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचा चांगला परिणाम होत आहे. त्याबरोबरच या अभियानामुळे झाडूंची विक्रीदेखील वाढली आहे. गेल्या दीड महिन्यापासून दिवसाकाठी सरासरी दहा टक्क्यांनी विक्रीत भर पडली आहे. अभियान राबविण्यासाठी संबंधितांकडून कमीत कमी २५ आणि जास्तीत जास्त ४० नगांपर्यंत झाडूं (खराटा) ची खरेदी केली जात आहे. दर दिवशी कोल्हापुरात सुमारे ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत झाडूंची विक्री होत आहे. अभियानामुळे साफसफाईबरोबरच झाडू विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात बांधणी !
तमिळनाडू आणि कर्नाटकमधून खराट्याच्या काड्यांची कोल्हापूरमध्ये आवक होते. याठिकाणी उत्तरप्रदेशमधून आलेले काही लोक त्यांची बांधणी करून शहरासह जिल्ह्यांतील घाऊक विक्रेत्यांना देतात. शहरात अशा पद्धतीने खराट्यांची विक्री करणारे आठ ते दहा घाऊक विक्रेते आहेत. त्यांच्याकडून किरकोळ विक्रेते खरेदी करून ग्राहकांना ते आपल्या माध्यमातून देतात.
१५ ते १४० रुपयांपर्यंत किमती
बांधणी आणि वजनावर खराट्याची किंमत ठरते. सध्या एक बांधणीचा खराटा १५ रुपये, त्यात जादा काड्या असलेला खराटा १७ रुपयांना मिळतो. दोन बांधणीचा २२, तर लोखंडी पट्टी असणारा खराटा २७, ३२ आणि ३८ रुपयांना मिळतो. काठी बांधलेल्या मोठ्या खराट्याची किंमत १३० ते १४० रुपयांपर्यंत आहे.