स्वच्छता मोहिमेने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 04:09 PM2018-06-05T16:09:59+5:302018-06-05T18:36:42+5:30
दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करून मुख्य सोहळा होणार आहे.
प्रवीण देसाई-रायगड : दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करून मुख्य सोहळा होणार आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजता चित्त दरवाजा येथे रायगड विकास प्राधिकरणतर्फे आयोजीत दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीमेची सुरुवात करण्यात आली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व संयोगीताराजे, शहाजीराजे छत्रपती, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुलकर, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सचिव अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेला सुरवात झाली.
हजारो शिवभक्तांच्या हातांनी गड बघता बघता चकचकीत करण्यात आला. होळीचा माळ येथे या मोहिमेचा समारोप झाला. दुपारी १२:३० वाजता गडावरील जिल्हापरिषदेच्या विश्रामगृह परिसरात अन्नछत्राचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी याचे नेटके नियोजन केले.
दुपारी ३:३० च्या सुमारास खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य शाही स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी शिवभक्तांसमवेत गडावर चढण्यास सुरुवात केली.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश म्हणुन वृक्ष रोपन व संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रायगडाचा पायथा येथे झाडांच्या बीयांची उधळण करण्यात आली.
गड पूजन
रायगड जवळील २१ गावच्या पंचक्रोशीतील सरपंच व शिवभक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ४.३० वाजता नगारखाना येथे गडपूजनाचा कार्यक्रम झाला.
उतखननातील वस्तूंचे प्रदर्शन
गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे हत्तीखाना परिसरात आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उदघाटन झाले. पुरातन भांडी यासह विविध वस्तू पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके
गडावरील होळीचा माळ येथे मावळ्यांच्या मर्दानी खेळाच्या थरारक प्रात्यक्षिकाना सायंकाळी ६.३०वाजता सुरवात झाली. यानंतर सायंकाळी ७ वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम झाला.यामध्ये कोल्हापूरसह राज्यभरातून आलेल्या शाहिरांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
संभाजीराजेंचा शिवभक्तांशी संवाद
राजसदर येथे रात्री ८ वाजता संभाजीराजे छत्रपती यांचा शिवभक्तांशी थेट संवादाचा कार्यक्रम झाला.यामध्ये शिवभक्तानी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली.
कीर्तन, जागर अन गोंधळाने रात्र जागली
शिरकाई मंदिर येथे रात्री ८:३० वाजता गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम झाला. तसेच जगदिश्वर मंदिर येथे रात्री ९ वाजता जगदिश्वराची वारकरी संप्रदायाकडुन किर्तन ,जागर व काकड आरती असा कार्यक्रम झाला. त्यानंतर राजसदर येथे रात्री ९ वाजता राजसदर येथे ही रात्र शाहीरांची हा शाहिरी सांस्कृतिक कार्यक्रम झाला.ही रात्र कीर्तन, जागर अन गोंधळाने जागली.
बुधवारी कार्यक्रमात
- सकाळी ६ वाजता गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण
- सकाळी ६ वाजता राजसदरेवरील शाहीरी कार्यक्रमास सुरुवात.
- सकाळी ८ वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम.
- सकाळी ९.३० वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज पालखीचे राजसदरेवर आगमन होणार आहे.
- सकाळी ९.५० वाजता खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य शाही स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन होणार आहे.
- सकाळी १०.१० वाजता छत्रपती शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते अभिषेक होणार आहे.
- सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक व पुष्पहार अर्पण सोहळा होणार आहे.
- सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.
- सकाळी ११.०० वाजता राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
- दुपारी १२.०० वाजता कार्यक्रमाची सांगता जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती शिवाजी महाराज समाधीचे दर्शनाने होणार आहे.