मानवी साखळीद्वारे स्वच्छता मोहीम

By admin | Published: December 13, 2015 11:36 PM2015-12-13T23:36:19+5:302015-12-14T00:07:44+5:30

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम : १४० किलोमीटरचा रस्ता झाला चकचकीत

Cleanliness campaign through human chain | मानवी साखळीद्वारे स्वच्छता मोहीम

मानवी साखळीद्वारे स्वच्छता मोहीम

Next

कोल्हापूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण राज्यभरात गेल्या वर्षापासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. प्रतिष्ठानतर्फे शहरात रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातील मुख्य चौक, रस्त्यांसह गल्लीचा परिसर ‘चकाचक’ झाला. यावेळी स्वच्छता अभियानात कुठेही ‘चमकोगिरी’ करताना कोणी दिसत नव्हते. सर्वसामान्य व्यक्तीपासून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, नोकरदार अशा १ हजार ९३७ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे १४० किलोमीटरचा रस्ता साफ केला. पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या दृष्टिकोनातून देशभर स्वच्छता मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. विद्यासागर यांनी ‘स्वच्छता दूत’ म्हणून नियुक्त केले आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राज्यभर राबविण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी शहरात विविध ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून या अभियानास प्रारंभ झाला. मानवी साखळीच्या पद्धतीने ठरावीक १४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ केले. यामध्ये १ हजार ९३७ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत महापौर अश्विनी रामाणे, नगरसेविका दीपा मगदूम, नगरसेवक राहुल माने, विजयसिंह खाडे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांसह गारगोटी, इचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर, माणकापूर, मौजे सांगाव, कागल, साळवण, कळे, बालिंगे, वाघवे, मलकापूर, बांबवडे, बच्चे सावर्डे, कोडोली, बहिरेवाडी, अंबप, प्रयाग चिखली, वडणगे, भुयेवाडी येथील स्वयंसेवक सहभागी झाले होते. +++

रस्ते, चौक चकाचक
शहरात राबविण्यात आलेल्या अभियानात प्रमुख रस्ते, चौक तसेच व्यापारी संकुल परिसरात स्वच्छता करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील विविध चौकांपासून सुरुवात झाली. प्रतिष्ठानच्या या मोहिमेत शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील संपूर्ण कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. शहरात १४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या दुतर्फा सफाई करण्यात आली. यामुळे अभियानानंतर संपूर्ण परिसर चकाचक झालेला दिसून आला.


येथे झाली स्वच्छता
शालिनी पॅलेस - महानगरपालिका - कावळा नाका, क्रशर चौक ते संभाजीनगर, संभाजीनगर ते सायबर चौक, कळंबा ते सीपीआर हॉस्पिटल, सीपीआर ते शुगर मिल, रेणुका मंदिर ते दसरा चौक, रेल्वे उड्डाणपूल ते बिंदू चौक, कसबा बावडा भगवा चौक ते मध्यवर्ती बसस्थानक, डीएसपी आॅफिस ते कावळा नाका, माउली पुतळा ते परीख पूल, पापाची तिकीट ते नाथा गोळे तालीम, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील सर्व गल्ल्या, रंकाळा तलावाचा संपूर्ण परिसर यासह यामध्ये येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली.
४टाउन हॉल, हुतात्मा पार्क, सिद्धाळा गार्डन, पद्माराजे गार्डन येथेही सकाळी सात ते सव्वाअकरापर्यंत ही मोहीम सुरू होती.


विविध गट सहभागी : ८१ टन कचरा उचलला, ट्रॅक्टर, डंपरचा वापर
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेमधून महापालिकेकडून सुमारे ८१ टन कचरा उचलण्यात आला. यावेळी विविध गट तयार करण्यात आले होते. या प्रत्येक गटाला दहा किलोमीटर अंतराची सफाई करावयाची होती.
यामुळे शहरातील विविध भागांत झालेल्या मोहिमेसाठी प्रतिष्ठानचे १ हजार ९३७ अधिक स्वयंसेवक सहभागी होते. मोहिमेंतर्गत सुमारे ८१ टन कचरा उचलण्याचे काम करण्यात आले. यासाठी नऊ ट्रॅक्टर, एक डंपर व १६ घंटागाड्यांचा वापर करण्यात आला.

Web Title: Cleanliness campaign through human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.