स्वच्छता मोहिमेत ४५ डंपर कचरा उचल, नाल्याच्या परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 02:04 PM2019-08-26T14:04:14+5:302019-08-26T14:07:32+5:30
कोल्हापूर शहरातील महापूर उतरल्यानंतर पूरग्रस्त अद्याप सावरले नसले, तरीही त्यांचे संसार उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. घरातील स्वच्छता करून रस्त्यावर टाकलेला कचरा, तसेच जयंती नाल्यातही कचरा महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला.
कोल्हापूर : शहरातील महापूर उतरल्यानंतर पूरग्रस्त अद्याप सावरले नसले, तरीही त्यांचे संसार उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. घरातील स्वच्छता करून रस्त्यावर टाकलेला कचरा, तसेच जयंती नाल्यातही कचरा महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला.
महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून सलग १८ व्या रविवारी ही मोहीम राबविली. स्वच्छता मोहिमेत सुमारे ४५ डंपर कचरा, गाळ, प्लास्टिक गोळा करण्यात आला. त्यानंतर जयंती नाल्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
स्वच्छता मोहिमेकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, सहा. आयुक्त संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. कचरा उठाव केलेल्या भागात महापालिकेच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली.
आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, दिलीप देसाई, गीता हासूरकर, आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, अरविंद कांबळे, सुशांत कांबळे, नंदू पाटील, श्रीराज होळकर, करण लाटवडे, शिवाजी शिंदे, मनोज लोट, मुनिर फरास व आरोग्य विभागाकडील २५० कर्मचारी व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
महापुरामध्ये काम केलेले महापालिकेचे आरोग्य, अग्निशमन विभागासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे केशवराव भोसले नाट्यगृह येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. पुणे येथील आरोग्य सेवा संघ व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्याचे डॉ. योगेश गाडेकर व त्यांच्या पथकांनी शिबिरात सहभाग घेतला.
स्वच्छता मोहिमेची ठिकाणे
सकाळी लक्ष्मीपुरी, कामगार चाळ, मोकाशी पॅचेस, रिलायन्स मॉलमागे, फोर्ड कॉर्नर, व्हिल्सन पूल, दसरा चौक, संप आणि पंप, पंचगंगा घाट नदी परिसर, कुंभार गल्ली, सुख सागर हॉटेल, शाहूपुरी, सुतारवाडा, गाडी अड्डा, जयंती नाला, सिद्धिविनायक मंदिर परिसर, कोरे हॉस्पिटल, संभाजी पूल परिसर, रंकाळा तलाव या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
संप आणि पंप हाऊस परिसरात वृक्षारोपण
फक्त कचरा उठाव करून आयुक्त डॉ. कलशेट्टी थांबले नाहीत, तर त्यांनी विवेकानंद कॉलेज एन. एस. एस.चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समवेत जयंती नाला परिसरातील संप आणि पंप हाऊस येथे वृक्षारोपण केले.
विद्यार्थ्यांचा प्राधान्याने सहभाग
स्वच्छता अभियानामध्ये विवेकानंद कॉलेज एन. एस. एस.चे ३० विद्यार्थी, विद्यार्थिनी, केएमसी कॉलेजचे २५ विद्यार्थी-विद्यार्थिनी व स्वरा फौंडेशनचे २० कार्यकर्ते, तसेच महापालिकेचे सुमारे ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. स्वच्छता मोहिमेमध्ये जेसीबी मशीन ७, ट्रॅक्टर-ट्रॉली १०, डंपर ८ होते.
स्वच्छतेसाठी ‘मावळा कोल्हापूर’कडून साहित्य भेट
शहर स्वच्छता मोहिमेसाठी लागणारे निर्जंतुकरणासाठी स्टेबल ब्लिचिंग पावडर, हॅन्डग्लोज, मास्क, खराटे, फिनेल बॉटल, आदी साहित्य मराठा कोल्हापूर या संघटनेच्या वतीने महापालिकेस मोफत देण्यात आले. हे साहित्य महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मावळा कोल्हापूरचे उमेश पोवार, अमोल गायकवाड, संदीप बोरगावकर, विनोद साळोखे, सोमनाथ माने, मयूर पाटील, ओंकार नलवडे, अनिकेत पाटील, आदी उपस्थित होते.