लोकसहभागातून स्वच्छता, सात डंपर कचरा उचलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:38 AM2019-05-10T11:38:21+5:302019-05-10T11:40:02+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने गुरुवारी जुना वाशी नाका येथील शाहू स्मृती उद्यान व पद्माराजे उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात ...
कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने गुरुवारी जुना वाशी नाका येथील शाहू स्मृती उद्यान व पद्माराजे उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उद्यानामधील झाडांना तसेच परिसराला रंगरंगोटी करून उद्यानामध्ये कचरा न करणे तसेच स्वच्छतेविषयीचे फलक लावण्यात आले. मोहिमेचा प्रारंभ महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
निसर्ग व आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी आपल्या परिसरातील उद्याने तसेच लगतचा परिसर स्वच्छ ठेवून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.
महापौर मोरे यांनी प्रत्यक्ष स्वच्छतेला सुरुवात करून उपस्थित नागरिकांच्या समस्या व सूचना समजावून घेऊन भविष्यात त्या पूर्ण करण्यासाठी महापालिका निश्चित प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. स्थायी सभापती शारगंधर देशमुख यांनीही या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून दोन्ही उद्याने आदर्श उद्यान बनविण्याचा मानस व्यक्त केला.
मोहिमेअंतर्गत सकाळी दोन तास पद्माराजे उद्यान व शाहू स्मृती उद्यान येथे नागरिकांनी श्रमदान केले. मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, लेखा विभाग, लेखापरीक्षण विभाग, ए वॉर्ड घरफाळा, अग्निशमन, शिक्षण मंडळ व उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच नागरिकांनीही मोठा सहभाग घेतला होता.
यामध्ये उपमहापौर महेश सावंत, विक्रम जरग, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, नोडल आॅफिसर संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, विधि अधिकारी संदीप तायडे, अतिक्रमण निर्मूलन विभागचे प्रमुख पंडित पोवार, नारायण भोसले, सुनील बिद्रे, सचिन जाधव, आर. के. पाटील, संजय नागरगोजे, रवी पोवार, बाबा साळोखे, सचिन पांडव, दिलीप देसाई, ‘व्हाईट आर्मी’चे अशोक रोकडे, उदय गायकवाड, डॉ. संजय वाळके, योगेश साळोखे, रंगराव चौगुले, पूनम माने, सागर नागवेकर, चेतन शिंदे व शिवाजी पेठ परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महापालिकेच्या दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने सात डंपर कचरा संकलित करण्यात आला.