कागलच्या पाझर तलावाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:47 PM2017-09-12T23:47:20+5:302017-09-12T23:47:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन प्रामुख्याने दूधगंगा नदीमध्येच केले जाते. याठिकाणी नगरपालिका दरवर्षी मूर्ती दानसारखे तसेच स्वच्छतेचेही उपक्रम राबविते. मात्र, पाझर तलावातही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे येथील प्रदूषण रोखण्यासाठी तलावात पोहण्यासाठी येणाºया पाझर तलाव स्वीमिंग ग्रुपने श्रमदान करीत या मूर्ती, निर्माल्य आणि त्या अनुषंगाने साचलेला कचरा तलावाबाहेर काढला. जवळपास दोन ट्रॉली हा कचरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने भरून नेला.
बोटिंग क्लब आणि वॉटर स्पोर्टस्मुळे कागलचा हा पाझर तलाव प्रसिद्धीस आला आहे. येथे रोज सकाळी पोहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यातून ६०-७० सदस्यांचा हा स्वीमिंग ग्रुप आकारास आला आहे. या ग्रुपतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तलाव संवर्धनाचा विचार करून या सदस्यांनी पहाटे पोहण्यासाठी आल्यानंतर दोन-तीन तास श्रमदान करीत हा कचरा संकलन केला. या पुढच्या काळातही तलाव स्वच्छता आणि संवर्धनासाठी असे प्रयत्न करण्याचा निर्धार या सदस्यांनी केला आहे. मुळात जयसिंगराव तलावाप्रमाणे या पाझर तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे संवर्धनासाठी होत असलेले हे प्रयत्न कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
या श्रमदान मोहिमेत पक्षप्रतोद प्रवीण काळबर, माजी नगराध्यक्ष अशोक जकाते, सदाशिव पिष्टे, कागल बॅँकेचे संचालक आप्पासो जकाते, सातप्पा कदम, नंदू माळकर, सुरेश पिष्टे, कृष्णात मोरे, आप्पासाहेब जकाते, महादेव चौगुले, अजित इंगळे, कुमार पिष्टे, रंगराव शेवडे, आदींनी सहभाग घेतला.