‘मावळा’तर्फे रायरेश्वर गडावर स्वच्छता
By admin | Published: June 10, 2015 10:00 PM2015-06-10T22:00:49+5:302015-06-11T00:51:01+5:30
तरुणांचा उत्साह : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राबविला उपक्रम
पाचगणी : शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून मावळा प्रतिष्ठानतर्फे रायरेश्वर येथे राज्याभिषेक सोहळा, दुर्गसंवर्धन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, दीपोत्सव, परिसर स्वच्छता, ध्वज लावणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली आणि येथील स्वंयभू महादेव, रायरेश्वराचा आशीर्वाद प्राप्त केला, अशा रायरेश्वर किल्ल्यावर मावळा प्रतिष्ठानने शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले.
रायरेश्वर गडावर ग्रामस्थांच्या सहकार्याने व संमतीने येथील जुनी असलेली शिवछत्रपतींची अर्धमूर्ती विधिवत पद्धतीने बदलून त्या ठिकाणी नव्या पूर्णाकृती सिंहारुढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शिवभक्तांच्या शिवगर्जनांनी आसमंत निनादून गेला होता.
रायरेश्वरावरील या कार्यक्रमा वेळी मावळा प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नितीन भिलारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)