राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 05:48 PM2019-04-27T17:48:31+5:302019-04-27T17:49:44+5:30
कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद यांच्यातर्फे शनिवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत महापालिका व जिल्हा परिषदेकडील २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यामुळे हा परिसर एकदम चकाचक झाला.
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद यांच्यातर्फे शनिवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत महापालिका व जिल्हा परिषदेकडील २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यामुळे हा परिसर एकदम चकाचक झाला.
प्रचंड प्रमाणात साठलेला कचरा, निर्माल्य, पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या व बाटल्या यांसह पंचगंगा नदीपात्रामध्ये निर्माण होत असलेले केंदाळ व पाण्यामधील न विरघळलेला ओला कचरा एकत्रित करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीपात्राच्या पश्चिम बाजूस जिल्हा परिषदेच्या वतीने तसेच पूर्व बाजूस महापालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली.
नदीकाठावर असलेल्या दत्तमंदिरालगतच्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा अस्ताव्यस्तपणे विखुरला गेला होता. या ठिकाणी स्वत: आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांनी कचरा एकत्र करून तो खतनिर्मितीसाठी पाठविला.
परिसराची स्वच्छता केल्यानंतर औषध फवारणी करून डीडीटी पावडर मारण्यात आली. तसेच टँकरद्वारे पाणी फवारणी करण्यात आली. मोहिमेत बावडा पंचगंगा नदीघाटावर उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या उपक्रमाचे कौतुक केले.
पंचगंगा घाटावर कपडे धुणाºया नागरिकांनी पाण्याचे प्रदूषण होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; शक्यतोवर नदीपात्रामध्ये कपडे धुऊ नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. याप्रसंगी आयुक्त कलशेट्टी यांनी यापुढे परिसरात कचरा टाकताना आढळून आल्यास संबंधितांची नावे महापालिकेकडे द्यावीत; म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल, अशा सूचना आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांना दिल्या.
मोहिमेमध्ये आयुक्त कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, नगरसेवक सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, संदीप नेजदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, करवीरचे बीडीओ सचिन घाटगे, प्रभारी अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्टेशन आॅफिसर दस्तगीर मुल्ला, परवाना अधीक्षक राम काटकर, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, केएमसी कॉलेजचे प्राचार्य सुरेश गवळी, सी. एम. फेलो आकांक्षा नरोदे व रोहिणी कळंबे, वडणगे सरपंच सचिन चौगुले, ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी विजय नलवडे, सदस्य सयाजी घोरपडे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, कसबा बावडा येथील पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य, आरोग्य निरीक्षक व आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग व अग्निशमन विभागाकडील अधिकारी सहभागी झाले होते.