स्वच्छतेसाठी शालेय विद्याथी सरसावले, १४ टन कचरा, प्लास्टिक उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:59 AM2019-12-23T10:59:27+5:302019-12-23T11:02:07+5:30
कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभरात १४ टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव केला.
कोल्हापूर : महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभरात १४ टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव केला. मोहिमेचा चौतिसावा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, शाहू दयानंद हायस्कूल, नेहरूनगर विद्यालय, सुभाषनगर विद्यालय, वीर कक्कया विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, नेहरूनगर परिसरांतील स्थानिक नागरिक व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली.
महापालिकेच्या वतीने दर रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. रविवारी मोहिमेला मोठ्या संख्येने विद्यार्थी आले होते. त्यांनी झोकून देऊन परिसराची स्वच्छता केली. यावेळी गटनेता सुनील पाटील, अरुण बारामते, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, लेखापाल बाबा साळोखे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, सर्व आरोग्य निरीक्षक व नागरिक उपस्थित होते.
स्वच्छ केलेला परिसर
कळंबा फिल्टर हाऊस ते मध्यवर्ती कारागृह मुख्य रस्ता, यलम्मा मंदिराचा परिसर, रिलायन्स मॉलचा संपूर्ण परिसर, दसरा चौक ते खानविलकर पंप, संप आणि पंप हाऊस, माळकर तिकटी ते शिवाजी मार्केट, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, शाहू नाका ते उड्डाणपूल टेंबलाई नाका, कोटीतीर्थ तलाव, डीएसपी आॅफिस ते भगवा चौक मुख्य रस्ता.
महापालिकेची यंत्रणा
- ४ जेसीबी,
- ८ डंपर,
- ६ आरसी गाड्या,
- ५ टिपर,
- १ पाणी टँकर
- महापालिकेच्या ९० स्वच्छता कर्मचारी.
प्लास्टिक कचरा झाला कमी
गेल्या सात महिन्यांपासून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक रविवारी स्वच्छ मोहीम घेतली जाते. मोहिमेमध्ये सर्व घटकांचा समावेश आहे. नागरिकांनाही प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रारंभी १०० टनांपर्यंत कचरा संकलित होत होता. आता केवळ १५ टन कचरा संकलित होत आहे. ओढ्यावरील रेणुका मंदिराच्या यात्रेत नागरिकांची या संदर्भात जनजागृती करण्यात आली.