स्वच्छतेची लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:43 PM2017-10-02T13:43:43+5:302017-10-02T13:49:41+5:30
कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्यावतीने आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहिम हाती घेवून कित्येक टन कचऱ्याची निर्गती करण्यात आली.
कोल्हापूरात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छता मोहिम राबवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, डॉ. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे प्रमुख राहुल चिकोडे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारताचा संकल्प करुन संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानास देशवासियांचा उर्स्फुत प्रतिसाद लाभला असून, आज स्वच्छतेची ही व्यापक लोकचळवळ निर्माण झाली आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने देशभर आज स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छतेची संपूर्ण राज्यात लोकचळवळ बनली असून, या स्वच्छता अभियानात यापुढील काळातही सातत्य ठेवून, स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यास सर्वांनी सक्रीय व्हावे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरही स्वच्छतेमध्ये सर्वांनी पुढाकार घेवून स्वच्छतेची दीर्घकालीन मोहिम हाती घ्यावी.