स्वच्छता सर्वेक्षणास कागलकर एकवटले गट-तट बाजूला... : नेतेमंडळी, नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक हातात झाडू घेऊन साफ-सफाईसाठी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:18 PM2018-01-17T23:18:29+5:302018-01-17T23:22:38+5:30
कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे
जहाँगीर शेख ।
कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे. अनेक दिग्गज्जांसह नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक हातात झाडू घेऊन साफ-सफाईसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र रोज सकाळी प्रत्येक प्रभागात पाहावयास मिळत आहे.
एकूणच कागल देशात अव्वल करण्यासाठी गट-तट, पक्ष-भेद विसरून कागलकर एकवटले आहेत.
प्रशासकीय पातळीवर गेले सहा महिने या स्पर्धेची तयारी सुरू आहे. विशेषत: स्वच्छता आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे नियोजन करीत आहेत. स्थानिक पातळीवर ब्रॅन्ड अॅम्बॅसडर म्हणून आम. हसन मुश्रीफ यांची निवड केली आहे. त्यांनीही या मोहिमेसाठी पुरेसा वेळ दिला आहे. मोबाईल अॅपसाठी युवकांशी संवाद साधला आहे.
महारॅलीद्वारे संपूर्ण शहरात पदयात्रा काढली आहे. या महारॅलीत भाजपाचे नगरसेवकही सहभागी झाले. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असणाºया भिंती रंगवून त्यावर संदेश लिहिले आहेत. वेशींना रंगरंगोटी केली आहे, त्यामुळे शहर आकर्षक दिसत आहे. आता प्रत्यक्ष केंद्रीय समिती सर्वेक्षणासाठी येणार असून, पालिकेचे कर्मचारी सकाळ-संध्याकाळ गटर्स, रस्ते सफाई, तसेच कचरा उठाव करीत आहेत. हे पाहून त्यांना सहकार्य म्हणून आता कार्यकर्ते, नेते, नागरिक, युवक मंडळे, स्वत:हून गटर्स, रस्ते साफ-सफाई करीत आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावयाचा हाच यामागचा निर्धार आहे. म्हणूनच चंद्रकांत गवळी, भय्या मानेपासून नविद मुश्रीफही सफाईसाठी रस्त्यावर दिसत आहेत.
कागल नवव्या स्थानावर
देशातील ४०४१ शहरात या स्पर्धा होत आहेत. कागल नगरपालिकेने सांघिक पातळीवर केलेल्या प्रयत्नाने मोबाईल अॅप विभागात नवव्या स्थानावर झेप घेऊन पैकीच्या पैकी गुण संपादन केले आहेत. मात्र, आता सर्वेक्षणात शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, उद्याने, बगीचे, व्यापारी क्षेत्र लाईन, जनसंवाद, आदींची पाहणी करून स्थान निश्चित केले जाणार आहे. म्हणूनच लोकसहभाग महत्त्वाचा ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत कागल अव्वल स्थानावर आले पाहिजे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक सकारात्मक विचाराने या मोहिमेत सहभागी झालो आहोत. आमचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी नेहमीच चांगल्या गोष्टींना पाठिंबा दिला आहे.
- विशाल पाटील-मलगेकर, विरोधी पक्ष नेता, नगरपरिषद