यड्रावला स्वच्छतेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:52 AM2017-08-09T00:52:23+5:302017-08-09T00:52:27+5:30

Cleanliness of Yedravil | यड्रावला स्वच्छतेचा बोजवारा

यड्रावला स्वच्छतेचा बोजवारा

Next



घन:शाम कुंभार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथे पंधरा दिवसांत डेंग्यूचा दुसरा रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छतेबाबत केलेला निष्काळजीपणा उघड झाला आहे, तर आरोग्य विभाग ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले आहे. ग्रामस्वच्छतेचा बोजवारा झाल्याने साथींचा फैलाव होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली आहे. एखाद्या जिवास धोका निर्माण झाल्यावरच वरिष्ठ शासकीय अधिकाºयांना याचे गांभीर्य लक्षात येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
येथील प्रियदर्शनी अपार्टमेंटमधील रहिवासी लक्ष्मीकांत लड्डा व याच परिसरातील प्रमोद कुंभोजे यांना पंधरा दिवसांच्या अंतराने डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले. पंधरा दिवसांपूर्वी लड्डा यांच्या डेंग्यूच्या निदानानंतर ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छता व आरोग्य विभागाने डास प्रतिबंधक औषधाची फवारणी केली असती, तर डेंग्यूचा दुसरा रुग्ण आढळला नसता. परिसरामध्ये ताप व कणकणीचे रुग्ण वाढत आहेत.
प्रियदर्शनी अपार्टमेंटचे सांडपाणी एका मोठ्या खड्ड्यात साठल्याने अनेक जंतू व डासांची उत्पत्ती होत आहे. सांडपाणी निचरा प्रश्न अनुत्तरित आहे; पंधरा दिवसांत दोघांना डेंग्यू, तर इतरांना ताप, सर्दी, खोकला असूनही ग्रामपंचायत आरोग्य विभाग उदासीन का? कायदा व नियमापेक्षा ग्रामस्थांचा जीव महत्त्वाचा आहे. सर्वच गोष्टी कायद्यानुसार होतात असे नाही.
याच पद्धतीने आर. के. नगर, रेणुकानगर, गावठाण या परिसरातील गटारी तुंबल्या आहेत. तेथेही साथीच्या आजारांचा फैलाव करणारे जंतू व डासांची निर्मिती झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. साथीच्या रोगाचा फैलाव झाल्यावर तहसीलदार व जिल्हाधिकारी लक्ष घालणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने परिसरात तापाची साथ व कणकण असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीने तुंबलेल्या गटारीतील पाणी उपसा केले पाहिजे. संभाव्य परिसरात डास व जंतू प्रतिबंधक पावडर फवारणी करून ग्रामस्थांमध्ये जागृती मोहीम तर आरोग्य विभागाने साथ प्रतिबंधक उपाय योजना करून आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बºयाच समस्या सुटू शकतात.
ग्रामपंचायत जबाबदार : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे यांनी प्रियदर्शनी अपार्टमेंट, पार्वती हौसिंग सोसायटी, कुंभोजे मळा, गावठाण, आर. के. नगर, रेणुकानगर, बेघर वसाहत या भागात पाहणी करून सांडपाणी निचरा व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेबाबत हयगय झाल्यास ग्रामपंचायत सर्वस्वी जबाबदार राहील, असे पत्र नांदणी केंद्राकडून देण्यात आले आहे.

Web Title: Cleanliness of Yedravil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.