राजस्थानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 01:54 PM2020-04-27T13:54:50+5:302020-04-27T13:55:42+5:30
कोल्हापूर : ‘जेईई’, ‘नीट’सह अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले राज्यातील विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
कोल्हापूर : ‘जेईई’, ‘नीट’सह अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले राज्यातील विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मध्यप्रदेश व गुजरात सरकारला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यातून महाराष्टÑात आणण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, आदींकडे जाण्यासाठी पूर्वतयारी परीक्षा द्यावी लागते. पूर्वतयारी परीक्षेच्या अभ्यासासाठी राजस्थानमधील ‘कोटा’ येथे राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी आहेत. ‘कोरोना’चा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राजस्थानमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची घालमेल वाढली आहे. त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार सरकारने आपआपल्या विद्यार्थ्यांना तेथून नेले आहे. मात्र महाराष्ट सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना नेण्याबाबत काहीच हालचाली केल्या नव्हत्या. याबाबत ‘लोकमत’ ने २३ एप्रिलला वृत्त दिले होते. त्यानंतर वेगाने प्रयत्न सुरू झाले आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्यप्रदेश, गुजरात सरकारला पत्रे दिली.
कोटा शहरात राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी अडकले असून, त्यांना बसमधून मध्यप्रदेश, गुजरात मार्गे महाराष्टÑात आणले जाणार आहे. त्यांच्या प्रवासास मान्यता देण्याची विनंती तेथील सरकारला करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत मध्यप्रदेश व गुजरात सरकारची परवानगी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्टÑात आणले जाणार आहे. सर्व प्रकारची दक्षता घेऊन त्यांची तपासणी करून आणण्यात येणार आहे. आल्यानंतर त्यांचे चौदा दिवस घरातच विलगीकरण करण्यात येणार आहे.