लाच घेताना लिपिक जाळ्यात
By admin | Published: May 15, 2015 10:06 PM2015-05-15T22:06:42+5:302015-05-15T23:39:23+5:30
‘एसीबी’ची कारवाई : पगार फरकाच्या बिलासाठी घेतले वीस हजार
सातारा : थकित पगाराचे व फरकाचे बिल तयार करून ते कोषागारात मंजुरीसाठी पाठविण्याकरिता वीस हजारांची लाच घेताना दहिवडी ग्रामीण रुग्णालयाच्या कनिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने दहिवडी येथे ही कारवाई केली.
अभयसिंह शहाजी साठे (वय ३५, मूळ रा. माळशिरस, जि. सोलापूर, सध्या रा. गोंदवले खुर्द, ता. माण) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. दहिवडी ग्रामीण रुग्णालयात तो कार्यरत असून, गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालयात सध्या प्रतिनियुक्तीवर आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे थकित पगाराचे व फरकाचे बिल तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याकरिता साठे याने वीस हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार २४ एप्रिल रोजी ‘एसीबी’कडे दाखल झाली होती. ११ मे रोजी साठे याने तक्रारदाराच्या पत्नीचे वेतन फरकाचे बिल बँकेत जमा केल्यानंतर ठरल्याप्रमाणे वीस हजार रुपये शुक्रवारी दहिवडी येथे आणून द्यावेत, असे साठे याने सांगितले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. (प्रतिनिधी)