लिपिकांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

By Admin | Published: July 15, 2016 11:54 PM2016-07-15T23:54:00+5:302016-07-15T23:58:25+5:30

उत्स्फूर्त प्रतिसाद : ग्रेड पेसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ५५५ कर्मचारी सहभागी

Clerical 'stellar closing' movement | लिपिकांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

लिपिकांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

googlenewsNext

कोल्हापूर : लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा केलेली नाही. यासह बदल्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. पदवीधर लिपिकांना अध्यापकाप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी द्यावी. लोकसेवा आयोगाच्या विविध पदांसाठी परीक्षांना बसण्यासाठी ४५ वर्षे वयापर्यंत सवलत द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह १२ पंचायत समिती व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुमारे ५५५ कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हातांनी परत जावे लागले.
जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासन वेळकाढू धोरण अवलंबत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून राज्यभरातील जिल्हा परिषद लिपिकांचा बेमुदत ‘लेखणी बंद’ आंदोलनाचा इशारा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने दिला होता. त्यानुसार हे आंदोलन सुरू करण्यात आले.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत : लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा केलेली नाही. यासह बदल्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. पदवीधर लिपिकांना अध्यापकाप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी द्यावी. लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या परीक्षांना बसण्यासाठी ४५ वर्षे इतक्या वयापर्यंत सवलत द्यावी. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी. कक्ष अधिकारी यांना ‘वर्ग दोन’चा दर्जा द्यावा. ‘एनएचआरएम’ व ‘आरकेएस’च्या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र लिपिक मंजूर करावा, कक्ष अधिकाऱ्यांना वर्ग २ चा दर्जा द्यावा, यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५५५ कर्मचारी सहभागी झाले आहेत. कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन
त्यांना रिकाम्या हातांनी परत जावे लागले.
बावड्यात पन्नासहून अधिक कर्मचारी सहभागी
कसबा बावडा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलनास सुरुवात केली. पंचायत समिती करवीरकडील कक्ष अधिकारी, अधीक्षक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, असे पन्नासहून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. पंचायतीचे कामकाज शुक्रवारी दिवसभर ठप्प झाले. संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष एकनाथ रसाळ, सचिव दयानंद पाटील, खजानिस निवास पोवार तसेच एस. व्ही. साळोखे, सचिन कांबळे, बी. एस. डवरी, बी. एस. चव्हाण, आदींसह अनेक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलन यशस्वी होणार : मगर
गारगोटी : जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यामुळे शुक्रवारपासून बेमुदत ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले. जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याने आंदोलन यशस्वी होणार आहे, असे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर यांनी केले. गारगोटीतही या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तालुका सचिव बाजीराव कांबळे, प्रशांत
मोहंडुळे, सदाशिव मंडी, अमित माळगे, शरद गोसावडेकर, महेश निकम, प्रशांत परीट, सुधीर चोपडे, श्रीमती बी. एस. भांदिगरे, एस. एम.
सुरवसे यांच्यासह सर्व लिपिक उपस्थित होते.
३0 कर्मचारी सहभागी
हातकणंगले : येथील पंचायत समितीकडील लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये ३0 कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनामध्ये राजदीप मेतके, कृष्णात माने, अनिल पाटील, यशवंत भानुदास, आर. आर. पाटील, संतोष कोळी, साजणे, युवराज कांबळे, सुधीर पाटील, आदी सहभागी झाले होते.
सर्व कमचारी सहभागी
गडहिंग्लज : राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या येथील शाखेतर्फे लिपिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गडहिंग्लज पंचायत समितीकडील सर्व विभागांतील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनात शाखाध्यक्ष रवींद्र जरळी, उपाध्यक्ष कपिल
पाटील, महिला प्रतिनिधी कांचन भोईटे, सतीश खमलेहट्टी, दयानंद पाटील, आदींसह विविध विभागांतील लिपिक सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)

चंदगडमध्ये वृक्षरोपणाने आंदोलन सुरू
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या ‘लेखणी बंद’ आंदोलनाची सुरुवात शुक्रवारपासून झाली आहे. पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करून या आंदोलनाला चंदगड येथील कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. पंचायत समिती परिसरात लिपिक संघटनेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संजय चंदगडकर यांनी यावेळी संघटनेच्या मागण्यांबाबत मार्गदर्शन केले. आंदोलनात प्रसाद पाटील, विलास हरेर, उदय गुरव, लक्ष्मी पुजारी, प्रिया पुजारी, तानाजी सावंत, मोसिन पटेल, भैरू कुंभार, शशिकांत सुतार, सॅमसंग धुपदाळे, रोहिणी गारे, राजश्री काकतकर, छब्बी पवार, सुनंदा घोलराखे, सुशीला तळपे, प्रकाश वार्इंगडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

Web Title: Clerical 'stellar closing' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.