जिल्हा बँकेचे शाखाधिकारी झाले लिपिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:20 AM2021-01-09T04:20:05+5:302021-01-09T04:20:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेली तीन-चार वर्षे शाखाधिकारी म्हणून काम केल्यानंतर आता लिपिक म्हणून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेली तीन-चार वर्षे शाखाधिकारी म्हणून काम केल्यानंतर आता लिपिक म्हणून काम करण्याची वेळ ३५ जणांवर आली आहे. बँकेच्या अडचणीच्या काळात जोखीम घेऊन जबाबदारी पार पाडल्यानंतर हे बक्षीस मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे.
मुख्य कार्यालयासह १९१ शाखांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा कारभार चालतो. प्रशासक व त्यानंतर संचालक मंडळाच्या कारकीर्दीत अनेक शाखांत शाखाधिकारी पदाची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नव्हते. हुद्दा शाखाधिकारी, मात्र काम लिपिक म्हणून करत होते. या कालावधित ३५ शाखांत लिपिकांनी जोखीम घेऊन शाखाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. गेली तीन-चार वर्षे त्यांनी अतिशय जबाबदारीने काम करत शाखांचा डोलारा सांभाळला.
बँकेत गेल्या आठ-दहा दिवसात पदोन्नतीसह बदल्या केल्या जात आहेत. यामध्ये पदोन्नतीने शाखाधिकारी पदावर बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे गेली तीन-चार वर्षे शाखाधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना आता लिपिक म्हणून काम करावे लागणार आहे. बँकेच्या अडचणीच्या काळात कोणी जबाबदारी घेत नव्हते, त्यावेळी जोखीम घेऊन काम केले, त्याचे बक्षीस हे मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे लिपिकाच्या पगारात शाखाधिकारी म्हणून काम करण्यास ते तयार आहेत.