Kolhapur: आजऱ्यात सहा हजारांची लाच घेताना कारकून जाळ्यात, दोन महिन्यानंतर मिळणार होती बढती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:21 PM2023-10-21T17:21:32+5:302023-10-21T17:21:50+5:30
मृत्युपत्राप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंदणीसाठी घेतली लाच
आजरा : मृत्युपत्रप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर नावनोंदणी करण्यासाठी ६ हजारांची लाच घेताना आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील निवास वसंत पाटील - निमतानदार ( मोजणी कारकून ), वय ४३, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी, सध्या रा.सामंत काॅम्प्लेक्स गांधीनगर रोड, आजरा ) यास अटक केली आहे. ही कारवाई सायंकाळी ४:३० वा. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आजरा येथे सापळा रचून करण्यात आली.
तक्रारदार यांच्या आईचा मामा यांना वारस नसल्याने त्यांनी त्यांची मिळकत मृत्युपत्राद्वारे तक्रारदार यांच्या आई हयात असताना त्यांच्या नावे केली होती. तक्रारदार यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या मिळकतीमधील ( चिमणे ता. आजरा ) येथील न. भू. क्र. ३७३ या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डला वारसा हक्काने तक्रारदार यांचे वडील व भाऊ यांचे नाव लावण्याकरिता निवास पाटील याने सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी लाच घेत असतानाच त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबतचा गुन्हा आजरा पोलिसात रात्री उशिरा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलिस नाईक सचिन पाटील, संदीप काशीद यांनी केली आहे.
बढतीपूर्वीच लाचलुचपतच्या जाळ्यात
निवास पाटील गेली अनेक वर्षे आजरा भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीस आहे. त्यास दोन महिन्यानंतर बढती मिळणार होती. मात्र, बढतीपूर्वीच तो लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे.
कारवाईनंतर सर्व कार्यालये क्षणात बंद
निवास पाटील यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची माहिती तहसील कार्यालयासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयात वाऱ्यासारखी पसरली. आपल्यावर कोणतेही गंडांतर येऊ नये म्हणून सर्वांनी तातडीने आपले कार्यालय बंद करून घरी जाणे पसंत केले.