Kolhapur Crime: परिचारिकेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी, सीपीआरमधील लिपिकास रंगेहाथ अटक
By उद्धव गोडसे | Published: March 9, 2023 06:27 PM2023-03-09T18:27:02+5:302023-03-09T18:27:32+5:30
स्थायित्व प्रमाणपत्र देण्यासाठी घेतली लाच
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआरमधील परिचारिकेकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हुसेनबाशा कादरसाब शेख (वय ४७, सध्या रा. बुरूड गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर, मूळ रा. कर्णिक नगर, सोलापूर) असे अटकेतील लाचखोर लिपिकाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) दुपारी सीपीआरमध्ये करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार परिचारिकेस पदोन्नती आणि नोकरीतील अन्य शासकीय लाभ मिळविण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अर्ज केला होता. २० दिवसांपूर्वी त्यांना प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल वरिष्ठ लिपिक शेख याने तक्रारदार परिचारिकेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याबाबत संबंधित परिचारिकेने गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करून पथकाने सीपीआरमध्ये शेख याच्या कार्यालयात सापळा रचला. पाच हजारांची लाच घेताना शेख याला रंगेहाथ अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस कर्मचारी नितीन कुंभार, संजीव बंबरगेकर, विकास माने, सचिन पाटील, रूपेश माने, सूरज अपराध, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.