Kolhapur: सातबारा उताऱ्यासाठी २७ हजार मागितले, तलाठी लिपिक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:54 AM2024-02-27T11:54:31+5:302024-02-27T11:54:57+5:30

प्लॉटच्या क्षेत्रफळात दुरुस्तीसाठी लाचेची मागणी

Clerk of Talathi and Tehsil office of Jaisingpur arrested for taking bribe | Kolhapur: सातबारा उताऱ्यासाठी २७ हजार मागितले, तलाठी लिपिक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

Kolhapur: सातबारा उताऱ्यासाठी २७ हजार मागितले, तलाठी लिपिक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

जयसिंगपूर : क्षेत्रफळाची दुरुस्ती करून सातबारा उतारा देण्यासाठी २७ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने जयसिंगपूरचा तलाठी व तहसील कार्यालयातील लिपिक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कारवाई केली. तलाठी स्वप्निल वसंतराव घाटगे (वय ३९, रा.रूकडी, ता.हातकणंगले), लिपिक शिवाजी नागनाथ इटलावर (वय ३२, सध्या रा.शाहू कॉलनी कसबा बावडा, मूळ गाव कुंडलवाडी, ता.बिलोली, जि.नांदेड) यांना अटक करण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील अंजली येथील तक्रारदार यांची जयसिंगपूर येथील गट नं. ८७ मध्ये जमीन आहे. या जमिनीमधील प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याने क्षेत्रफळाची दुरुस्ती करून सातबारा उतारा मिळावा यासाठी तक्रारदाराने तलाठी घाटगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी तलाठ्याने २२ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, हे पैसे शासकीय फी असावी असे समजून तक्रारदार यांनी दिले होते.

मात्र, कामाकरिता तलाठी यांची पुन्हा भेट घेतल्यानंतर पुन्हा ३५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, पूर्वी पैसे दिले असताना असे विचारल्यानंतर तो प्रोटोकॉलसाठी होता, असे तलाठ्याने सांगितल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. यामध्ये तलाठी घाटगे यांनी क्षेत्रफळाची दुरुस्ती करून उतारा देण्यासाठी २० हजार रुपये तसेच तहसील कार्यालयातील लिपिक इटलावार यांच्याकरिता ५ हजार व खासगी टायपिस्टकरिता २५०० रुपये अशी एकूण २७ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे तर तलाठ्याने सांगितल्याप्रमाणे लिपिक इटलावर यानेही ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार कोल्हापूरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, कर्मचारी प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, सूरज अपराध, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.

पडताळणीनंतर कारवाई

तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने १६ नोव्हेंबर व ४ डिसेंबर २०२३ रोजी लाचलुचपत विभागाने पडताळणी केली होती. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने तलाठी व लिपिकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईची चर्चा

सात महिन्यांपूर्वी तलाठी स्वप्निल घाटगे याची इचलकरंजी येथून जयसिंगपूर येथे बदली झाली होती, तर जयसिंगपूरचे तत्कालीन तलाठी अमोल जाधव याची इचलकरंजी येथे बदली झाली होती. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी लाच घेताना जाधव याच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि. २६) घाटगे याच्यावरही कारवाई झाल्याने चर्चेचा विषय ठरला.

Web Title: Clerk of Talathi and Tehsil office of Jaisingpur arrested for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.