चाफोडी शाळेमागे उंच कडा, पुढे दरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:04 AM2017-08-21T00:04:17+5:302017-08-21T00:04:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : चाफोडी (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीमागे उंच कडा असून, त्यावर मोठ मोठी झाडे वाढलेली आहेत. इमारतीपासून दोन ते चार फूट अंतरावर असलेल्या या दरडावरील दगड व झाडे केव्हाही ढासळतात. शाळेच्या मैदानापुढे २५ फूट खोल दरी आहे. शाळेची भौगोलिक रचनाच अडचणीची असल्याने विद्यार्थी भीतीच्या छायेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून शाळेच्या सभोवती सुव्यवस्थित संरक्षण कठडा बांधून मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चाफोडीच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. येथे आठ शिक्षक कार्यरत असून, १४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंग्रजी व मराठी माध्यमासहीत संगणकाचे विशेष शिक्षणही येथे दिले जाते. येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वर्षानुवर्षे चांगली आहे. सातेरीच्या डोंगर कपारित वसलेल्या चाफोडीच्या प्राथमिक शाळेची इमारत गावाच्यावर डोंगरात व अडचणीच्या ठिकाणी आहे. शाळेच्या पाच खोल्यांचे बांधकाम जीर्ण झाले आहे. पाठीमागच्या बाजूने वाढलेली लहान, मोठी झाडे शाळेवर कोसळण्याची भीती आहे. शेजारील शेतकºयांनी काही ठिकाणी अतिक्रमण केल्याने खेळाचे मैदान शेतवडीत ढासळत आहे. शाळेसमोरील रस्ता मैदानापासून २० ते २५ फूट खोल असल्याने शाळेच्यासभोवती संरक्षण कठडा बांधावा, अशी मागणी होत आहे. संरक्षण कठड्याच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या जिवास धोका होण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे याविषयी वेळोवेळी मागणी केली आहे. तरीदेखील शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.