कोल्हापुरातील गिर्यारोहकांच्या चमूने १३ हजार फूट शिखरावर फडकविले ७४ तिरंग्यांचे तोरण, उणे दहा डिग्रीमध्ये मोहीम फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 12:17 PM2023-02-01T12:17:32+5:302023-02-01T12:17:50+5:30
तापमान उणे १० अंशापर्यंत खाली आले. पायाची आणि हाताची बोटे पूर्णपणे गोठलेली होती.
कोल्हापूर : येथील २३ जणांच्या समिट ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांचा चमू उत्तरांचलमधील १३ हजार फूट उंचीचे केदारकंठ हे शिखर चढाईसाठी रवाना झाले होते. या समूहात १७ वर्षांच्या निमिष लवटे पासून ७० वर्षांच्या डॉ. हणमंत पाटील यांचा सहभाग होता. यात दहा महिला सुद्धा सहभागी होत्या. त्यांनी उणे दहा डिग्री तापमानात ही यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला.
समिट ॲडव्हेंचर्सच्या या मोहिमेत समीर गंगातीरकर, निशांत लवटे, निमिष लवटे, राहुल लिंग्रस, धनाजी पोवार, अमित माटे, डॉ. हर्षवर्धन जोशी, डॉ. निशांत कालेल, डॉ. सुनील खट्टे, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. दीपक जोशी, स्वरूपा कोरगांवकर, प्रीती तांबडे, स्नेहा शेडबाळे, माधवी शेडबाळे, पूजा खोत, शुभांगी भोकरे, नितू करंजुले, सरिता पाटील, वर्षा गुंजाळ, डॉ. हणमंत पाटील आणि आटपाडीच्या डॉ. प्रतिभा पाटील सहभागी झाल्या. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी केले.
केदारकंठ उत्तरांचलच्या पश्चिम भागात डेहराडूनमधील सांक्री तालुक्यात आहे. हा प्रदेश हिमाचल, यमनोत्री आणि गंगोत्रीशी हिमालयातील विविध पासेसच्या माध्यमातून जोडला आहे. हे शिखर फार उंच नाही. तांत्रिक चढाईची कोणतीही साधने न वापरता या शिखरावर चढाई करता येते, हे खरे असले तरी हिवाळ्यामध्ये यावर चढाई करणे वातावरणीय दृष्टिकोनातून खूपच अवघड असते.
बर्फवृष्टी, प्रचंड धुके त्यामुळे काही फुटापलीकडील सुद्धा दिसत नव्हते. समिटची चढाई होती दोन हजार फुटांची. वातावरण तर आणखीनच थंड होत होते. तापमान उणे १० अंशापर्यंत खाली आले. पायाची आणि हाताची बोटे पूर्णपणे गोठलेली होती. जोडीला हिमवर्षाव सुरू झाला. बर्फाचा मारा होत होता. त्यात ही मोहीम पूर्ण केली व ७४व्या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी ७४ राष्ट्रध्वजांची पताका केदारकंठवर फडकावून आगळीवेगळी मानवंदना अर्पण केली.