लाडूचा प्रसाद बंद करा
By admin | Published: March 2, 2016 12:41 AM2016-03-02T00:41:08+5:302016-03-02T00:44:50+5:30
शिवसेनेची मागणी : विनाकारण चर्चा थांबविण्याचे आवाहन
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या लाडवाच्या प्रसादावरून सध्या चर्चेला उधाण आले असून प्रसाद करण्यामागे सात्त्विकता, सेवेच्या नावाखाली बुंदी लाडू कुणी वळायचा, या मुद्द्यावरून प्रसिद्धी मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड ही देवीच्या प्रसादाच्या बाबतची नामुष्कीजनक बाब आहे. त्यामुळे हा लाडवाचा प्रसाद बंद करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
खरंतर पुरातन काळापासून फुटाणे व खडी-साखर हा श्री अंबाबाईचा पारंपरिक प्रसाद असताना त्यामध्ये बदल करून कुणाच्या तरी सोयीसाठी जाणीवपूर्वक या पारंपरिक प्रसादाला फाटा देत लाडूचा प्रसाद ठरविण्याचा अट्टाहास कशासाठी. म्हणूनच सर्वप्रथम प्रसाद म्हणून लाडू हा बंद करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे श्री अंबाबाईच्या नावाखाली सुरू असलेली स्वत:चा स्वार्थ साधणारी दुकानदारी आपोआपच बंद होईल.
ऊठसूट कुणीही श्री अंबाबाईसंदर्भात विषय घ्यावयाचा पुढे १५ दिवस विनाकारण त्यावर चर्चा करायची थांबविली पाहिजे. कारण साधून कोल्हापूरची बदनामी होत आहे. वास्तविक, श्री अंबाबाई मंदिर व परिसरातील विकासाबाबत केवळ चर्चा करण्यापेक्षा त्यावर ठोस निर्णय होऊन त्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मंदिर विकासाबाबत वर्षानुवर्षे सुरू असलेले हे चर्चेचे गुऱ्हाळ न थांबण्यास त्याची पूर्तता हे केवळ कोल्हापूरचे स्वप्नच बनत चालले आहे. हे स्वप्न सत्यात आणणे ही सर्व कोल्हापूरची गरज आहे.
याचबरोबर मंदिर परिसरातील सुविधांमध्ये वाद व सुधारणा करणे जास्त गरजेचे आहे. मंदिर पावित्र्याच्या दृष्टिकोनातून मंदिराच्या तटबंदीला लागून असलेले चप्पल स्टँड अन्य ठिकाणी हलविणे गरजेचे आहे. मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, मंदिर व परिसरात झालेले अतिक्रमण, भिकाऱ्यांचा परिसरातील सुरू असलेला उपद्रव याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्याने सुधारणा करणे गरजेचे आहे.
सुविधांची वानवा
परिसरात सुविधांची वानवा असून त्या सुधारणा करणे गरजेचे आहे. कोणत्याही विषयावर वाद निर्माण न करता सुविधांबाबत आग्रही राहावे, अशी अपेक्षा शिवसेने व्यक्त केली आहे.