भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा, कोल्हापूर महापालिका सभेत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:25 PM2018-08-13T18:25:20+5:302018-08-13T18:33:52+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणाऱ्या भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत ‘भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा,’ अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी त्यांना फटकारले.
कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणाऱ्या भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत ‘भाजप सरकारचे गोडवे गाणे बंद करा,’ अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी त्यांना फटकारले.
मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यावरून उडालेली शाब्दिक चकमक आणि घोषणाबाजी यामुळे सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत काहीकाळ तणाव तसेच गोंधळ निर्माण झाला. अखेर ही सभा तहकूब ठेवण्यात आली.
महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच विषयपत्रिकेचे वाचन करण्यापूर्वीच प्रा. जयंत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याचा विषय उपस्थित केला. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनास मातृसंस्था असलेल्या महानगरपालिकेनेदेखील पाठिंबा देणे आवश्यक आहे म्हणूनच ही सभा तहकूब ठेऊन सर्व नगरसेवकांनी मोर्चाने जाऊन दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होऊया,अशी सूचना केली. त्यावर सभागृहाचे एकमत झाले. सभा तहकूब ठेवण्याचा सर्वांनीच आग्रह धरला. महापौर बोंद्रे यांनीही सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.
मात्र, तत्पूर्वी सभागृहात या विषयावर चर्चा झाली. अशोक जाधव यांनी मराठा समाजातील मुलांची शिक्षण क्षेत्रात वाताहत झाली असल्याने सरकारने अधिक अंत न पाहता आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. मराठा समाजाची मागणी रास्त असून मागास व इतर मागास यांचे आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली.
बहुसंख्य मराठा समाज शेतीवर अवलंबून असल्याने आणि शेतीउद्योग धोक्यात आल्याने मराठा समाजाची वाताहत होत आहे म्हणूनच बी.सी., ओ.बी.सी.च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासह मुस्लिम, धनगर समाजालाही आरक्षण द्या, अशी मागणी नीलोफर आजरेकर यांनी केली. शाहू महाराजांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर समाज दुर्लक्षित झाला.
मराठा समाज श्रीमंत, जमीनदार म्हणून गणला गेला. शेतीउद्योग अडचणीत आल्यानंतर या समाजाला आर्थिक व सामाजिक मागासलेपण प्राप्त झाले. हे मागासलेपण लक्षात घेऊन नोकरीत व शिक्षणात आरक्षण देणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा निर्णय घ्यावा, न्यायालयानेही या निर्णयात हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा आजरेकर यांनी बोलून दाखविली. बारा बलुतेदारांचा पोशिंदा असलेल्या मराठा समाजाला मागासलेपण येत असल्याने आरक्षण देणे आवश्यक असल्याचे रूपाराणी निकम यांनी सांगितले.
सूर्यवंशी-देशमुख यांच्यात वादावादी
भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. मात्र, पाठिंबा देत असताना सूर्यवंशी यांनी राज्य सरकार आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आरक्षण देण्याकरीता सन २०१०पर्यंत मागासवर्गीय आयोग स्थापन करणे आवश्यक असताना तो केला नाही.
भाजप सरकारने तो स्थापन केला. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. मराठा वसतिगृहे सुरू होत आहेत. पन्नास टक्के फी सवलत दिली जात आहे. दहा लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज सरकार भरत आहे,असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
सूर्यवंशी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, अर्जुन माने, भूपाल शेटे यांनी जोरदार हरकत घेतली.
पक्षाचे, सरकारचे प्रमोशन बंद करा, सरकारचे गोडवे गाणे बंद करा, अशा शब्दांत त्यांनी सूर्यवंशी यांना फटकारले तर जयंत पाटील यांनी ‘तुम्ही पक्षीय अभिनिवेश बाळगून बोलू नका. आम्हीही मग न्यायालयात याचिका दाखल करणारा केतन तिरोडकर कोण, त्याला कोणाचा पाठिंबा आहे, त्याचे वकील कोण, यावर आम्ही चर्चा उपस्थित केली तर तुमची अडचण होईल’, अशा शब्दांत सुनावले. त्यातूनही सूर्यवंशी बोलतच होते. त्यामुळे अधिकच संतप्त झालेले देशमुख यांनी ‘मराठा समाजातील एका विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती दिल्याचे सांगा,’ अशा शब्दांत आव्हान दिले.
भाजप-ताराराणी आघाडीचा सभागृहातच ठिय्या
भाजप-ताराराणी आघाडी नगरसेवकांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला; पण काँग्रेस-राष्टÑवादी नगरसेवकांसह मोर्चाने जाऊन दसरा चौक येथे ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यास नकार दिला. त्यांनी सभेचे कामकाज संपल्यानंतर सुमारे तासभर सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये स्थायी सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे यांच्यासह ३३ नगरसेवकांनी भाग घेतला.