केएमटीच्या २४ बसेस सुट्या भागांअभावी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:19 PM2019-12-20T12:19:34+5:302019-12-20T12:22:49+5:30
के.एम.टी.च्या ताफ्यातील १०२ बसेसपैकी तब्बल २४ बसेस गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुट्या भागांअभावी बंद असून, रोजची चार हजार किलोमीटरची धाव कमी झाल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत समोर आली. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था देण्याचे प्रयत्न करण्याऐवजी सुट्या भागांअभावी बसेस बंद ठेवण्यातच अधिकारी धन्यता मानत असल्याबद्दल बैठकीत आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
कोल्हापूर : के.एम.टी.च्या ताफ्यातील १०२ बसेसपैकी तब्बल २४ बसेस गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुट्या भागांअभावी बंद असून, रोजची चार हजार किलोमीटरची धाव कमी झाल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत समोर आली. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था देण्याचे प्रयत्न करण्याऐवजी सुट्या भागांअभावी बसेस बंद ठेवण्यातच अधिकारी धन्यता मानत असल्याबद्दल बैठकीत आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
सुट्या भागांअभावी २४ बसेस बंद आहेत. तसेच ठोक मानधनावरील चालक, वाहक कामावर येत नसल्याने काही बसेस बंद ठेवाव्या लागतात. मोठ्या संख्येने बसेस बंद राहत असल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून महापौर लाटकर यांनी सुट्या भागांअभावी बंद असलेल्या बसेस आठ दिवसांत दुरुस्त करून घेण्याच्या सूचना दिल्या.
ठोक मानधन तत्त्वावर देण्यात येत असलेला १० हजार रुपये पगार हा कमी असल्याने कर्मचारी कामावर येत नाहीत; तसेच केव्हाही काम सोडून जात आहेत. त्यांचा पगार शासन निर्णयाप्रमाणे १४ हजार ५०० रुपये करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
के. एम. टी.कडील कर्मचाऱ्यांवर दैनंदिन वेतनावर एक लाख ५६ हजार रुपये खर्च होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे संचित देणे द्यावयाचे असून ते देण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. के.एम.टी कडे ११ ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. त्यांपैकी आठ पार्किंग सुरू असून तीन ठिकाणच्या पार्किंगचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. इतर पार्किंगच्या ठिकाणी कर्मचारी पगारावरील खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे, अशीही माहिती समोर आली.
गाडीअड्डा येथील जागेत के.एम.टी. विभागाने पार्किंग सुरू करावे, रेल्वे स्टेशन येथे रेल्वे येण्याच्या वेळेत आपला कर्मचारी ठेवून तेथे बस सुरू करावी, ग्रामीण भागातील रिक्षांना लोकेशन्स ठरवून दिलेली आहेत; त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवावी, जाहिरातीतून उत्पन्न वाढवावे, शासनाकडे निधीची मागणी करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, वर्क्स मॅनेजर प्रतापराव भोसले, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, कामगार अधिकारी संजय इनामदार, संजय मोरे, दीपक दुर्गुळे, सुरेश माने, दिनेश सोमण, आदी उपस्थित होते.