हुपरीत बंदसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:42+5:302021-04-21T04:24:42+5:30

हुपरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बाजारपेठेत सर्वत्र बंदसदृश स्थिती असल्याने हुपरी (ता. हातकणंगले) सह परिसरातील गावातील चांदी ...

Closed position in the hoop | हुपरीत बंदसदृश स्थिती

हुपरीत बंदसदृश स्थिती

Next

हुपरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बाजारपेठेत सर्वत्र बंदसदृश स्थिती असल्याने हुपरी (ता. हातकणंगले) सह परिसरातील गावातील चांदी उद्योगालाही याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच यापुढेही उद्भवणाऱ्या दीर्घकालीन मंदीच्या वातावरणालाही तोंड द्यावे लागणार आहे. गेले वर्षभर कोरोना महामारी आणि अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती यामुळे सराफ बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परिणामी येथील चांदी व्यवसायातील संपूर्ण उलाढाल ठप्प झाली असून, मोठ्या प्रमाणात मंदीसदृश परिस्थिती उभी राहिलेली आहे.

गेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीच्या चक्रव्यूहात चांदी उद्योग तर सापडला आहेच, याबरोबरच नजीकच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगही बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे परिसरातील संपूर्ण आर्थिक चक्रच कोलमडून गेल्याने हजारो कुटुंबांवर एकाचवेळी बेरोजगार होण्याचे संकट उभे राहिले आहे. हुपरी परिसरात जवळपास ५००० उद्योजक आणि २५००० कारागीर या व्यवसायात कार्यरत आहेत. या व्यवसायातील दररोज होणारी कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यात तसेच परराज्यात दागिनेही घेऊन जाऊ शकत नाहीत अन्‌ परपेठेवरून कच्ची चांदीही आयात होऊ शकत नाही. अशा विचित्र संकटात येथील चांदी व्यवसाय सापडला गेला आहे. त्यामुळे यापुढील काही महिने येथील चांदी उद्योगात दीर्घकालीन मंदीचेच वातावरण राहणार यात काही शंकाच नाही. चांदी उद्योगातील पूरक व्यावसायिकांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने हुपरी व परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चौकट :

उद्योजक परिस्थितीवर मात करतील

येथील उद्योजक कल्पक आणि नावीन्याची आस असणारे आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नक्कीच नवीन सुरुवात करतील. असा विश्वास उद्योजक अमर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

सरकारने लक्ष देण्याची गरज

चांदी उद्योजक मोहन खोत म्हणाले, हुपरी व परिसरातील चांदी उद्योजक, चांदी धडी उत्पादक व कारागीर, पूरक उद्योग संघटित कामगारांत मोडतात. हा हस्तकला उद्योग असल्यामुळे आणि यामध्ये लाखो लोक आपला उदरनिर्वाह करत असल्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

----------::---------

Web Title: Closed position in the hoop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.