बंदला प्रतिसाद; वस्त्रोद्योग नगरी थंडावली

By admin | Published: December 23, 2016 12:57 AM2016-12-23T00:57:26+5:302016-12-23T00:57:26+5:30

सहाव्या दिवशीही आंदोलन : कोणताही अनुचित प्रकार नाही; सर्व व्यवहार बंद; दुचाकी रॅलीने वातावरण तापले

Closed responses; Textile City Shallow | बंदला प्रतिसाद; वस्त्रोद्योग नगरी थंडावली

बंदला प्रतिसाद; वस्त्रोद्योग नगरी थंडावली

Next

इचलकरंजी : यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ‘मी स्वाभिमानी कारखानदार’ संघटनेच्यावतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात शहरातील सर्व व्यवहार बंद राहिले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस प्रशासनानेही ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी संंघटनेच्यावतीने सहा दिवसांपासून संतोष कोळी ऊर्फ बाळ महाराज व अमोद म्हेतर हे आमरण उपोषणास बसले आहेत. आर्थिक टंचाईमुळे मेटाकुटीला आलेल्या यंत्रमागधारकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आपले कारखाने बंद ठेवले आहेत. आंदोलन अंतर्गत गुरुवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली होती.
सकाळपासूनच शहर व परिसरातील प्रमुख मार्गासह भागाभागांतील सर्वच व्यवहार बंद ठेवले होते. यंत्रमागधारकांच्यावतीने दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात येत होते. रॅलीला शिवाजी पुतळ्याजवळ अडवून पोलिसांनी बंदचे आवाहन शांततेत करावे. कोणालाही जबरदस्ती करू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी काहीकाळ तणाव झाला होता. आंदोलनकर्ते व पोलिस यांच्यात सामंजस्य चर्चा झाल्यानंतर वाद निवळला. रॅली शहरभर फिरली. त्याला व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला. दरम्यान, मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे शॉपिंंग सेंटर व गांधी पुतळा परिसरात फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्याला अडथळा निर्माण केला गेला नाही. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनानेही बंदोबस्त तैनात केला होता. त्यामध्ये दोन स्ट्रायकिंंग फोर्स, विशेष कृती दलाचा समावेश होता. (वार्ताहर)


खर्चीवाल्यांच्या मजुरीबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे बैठक घ्यावी
आंदोलनकर्त्यांच्यावतीने गुरुवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत स्थानिक पातळीवर मार्ग काढण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी केली. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणतीही स्पष्टता केली नाही.

प्रांत कार्यालयावर
आज किल्ली मोर्चा
या आंदोलनांतर्गत आज, शुक्रवारी प्रांत कार्यालयावर किल्ली मोर्चा काढणार आहे, अशी घोषणा गुरुवारी संतोष कोळी ऊर्फ बाळ महाराज यांनी केली. यंत्रमागधारकांनी कारखान्यांना घातलेल्या कुलुपांच्या किल्ल्या घेऊन प्रांत कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन केले.

विविध स्तरांतून पाठिंबा
गुरुवारी दिवसभरात आंदोलनाला विविध
स्तरांतून पाठिंबा मिळाला. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर, किराणा व्यापारी असोसिएशन, कडेगाव पॉवरलूम असोसिएशन, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.


इचलकरंजीत वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत गुरुवारी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आंदोलकांनी दुचाकी रॅली काढली.

Web Title: Closed responses; Textile City Shallow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.